गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आयबीपीएस परीक्षा व एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला. यासंदर्भात सरकार दरबारी वारंवार मागणी करूनदेखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्यामुळे अखेर हे परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. दरम्यान, या आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी झाले असून आता शरद पवारांनीही मैदानात उतरण्याचा इशारा सरकारला दिला आहे.