Kalyan Rape & Murder Case: कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या विशाल गवळीकडे तो मानसिक रुग्ण असल्याचा दाखला पोलिसांना तपासात आढळून आल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. याच दाखल्याच्या आधारे त्याने यापूर्वी दोन वेळा न्यायालयातून जामीन मिळवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.ठाणे गुन्हे शाखा आणि कल्याण गुन्हे शाखेचे पथक अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरणाचा विविध बाजुने तपास करत आहे. मुलीची हत्या केल्यानंतर विशाल बुलढाणा येथे पळून गेला होता. गुरुवारी सकाळी त्याला ठाणे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात आणले. त्याला नौपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने विशालला पत्नीसह दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.














