लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात मोठा घोळ झाल्याचा दावा सातत्याने केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या अहवालांचा दाखला देत मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांत वाढलेल्या मतदानाची आकडेवारी, वाढलेले मतदार यासह मतदानाच्या निकालावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी आता असा दावा केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही मतदानाच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढले होते. मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं आहे.