संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केला असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरीता व मदत मिळवून देण्याकरीता अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी रविवारी अमरावतीच्या दर्यापुर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. बांधावरुनच माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व अमरावती जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना दुरध्वनीव्दारे शेतातील परीस्थिती सांगून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मागणी केली.