Pune Accident Case Gautami Patil First Reaction: पुण्यातील अपघात प्रकरणात नृत्यांगना गौतमी पाटील हिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून धारेवर धरलं जात आहे. जखमी रिक्षाचालक मरगळे यांच्या लेकीने अलीकडेच माध्यमांसमोर येत गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी केली होती. इतकंच नाही तर माझे वडील मृत्यूशी झुंज देत असताना गौतमी शो कसले करते असं म्हणत तिने गौतमीच्या कार्यक्रमांवर सुद्धा आक्षेप घेतला होता. दरम्यान या प्रकरणात आता पहिल्यांदाच गौतमी पाटीलची प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहे. गौतमीने मरगळे यांच्या लेकीचे आरोप खोडून काढत मी ज्या वेळी हा प्रकार घडला तेव्हा गाडीत नव्हतेच हे पोलिसांनी सुद्धा तपासलं असल्याचं सांगितलंय. इतकंच नाही तर आपल्या टीमकडून मरगळे कुटुंबासाठी मदतीचा हात देण्यात आला होता पण त्यांनीच मदत नाकारली असे सुद्धा गौतमीने सांगितले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर गौतमीचा इंदापूरातील शो रद्द करण्याची मागणी होत होती मात्र हा शो सुरळीत पार पडल्याचे सांगत गौतमीने आयोजकांचे आभार मानले आहेत.