सायली सोमण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औद्योगिक क्रांती, जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान या महत्त्वाच्या घटकांमुळे इतर क्षेत्रांप्रमाणे फॅशन इंडस्ट्रीतसुद्धा एक ग्राहक म्हणून आपल्याला आज कपडे व त्यासंबंधित वस्तू बाजारात विविध प्रकारात आणि खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. खासकरून फॅ शन क्षेत्रात कुठलेही कपडे अथवा अ‍ॅक्सेसरी लोकांना एकाच नजरेत पसंत पडायला हवी असेल तर त्या वस्तूंचा ‘रंग’ हा आजच्या घडीला केंद्रबिंदू मानला जातो.

आपल्या रोजच्या दिनक्रमात कुठल्याही प्रकारचे कार्य पार पाडताना आपण बऱ्याचदा त्या कामाचा निकाल किंवा त्या वस्तुस्थितीचा अंदाज आपल्या दृष्टीस आलेल्या गोष्टींच्या बाह्य़रूपावरून किंवा त्यांच्या रंगांवरून ठरवतो. दिवसाच्या सुरुवातीचंच घ्यायचं झालं तर चहाचा रंग त्या चहाची चव ठरवतो, पोळी भाजताना ती काळी झाली म्हणजे ती करपली, घराबाहेर पडल्यावर आकाश निळ्या रंगाऐवजी मळभट दिसलं की आपला मूड लगेच बदलतो, कुठल्याही बागेत फिरताना तिथल्या हिरवळीवर एखादं रंगीत फुलपाखरू दिसलं तर एखाद्या लहान मुलाप्रमाणेच आपलं मन प्रसन्न होतं. आपल्या आयुष्यात रंगाचं महत्त्व सांगणारी अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याचप्रमाणे आपल्या कपडय़ांचा रंग आपल्याला त्या कपडय़ांविषयी बरंच काही सांगून जातो. उदाहरणार्थ, आपल्या देशात लाल आणि हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक असल्यामुळे नववधूंच्या साडय़ांवर तो जास्त दिसतो, तर पांढरा रंग शांततेचं प्रतीक असल्यामुळे एखाद्या मौन, श्रद्धांजली सभेला जाताना पांढरे कपडे घातले जातात.

दुकानात कपडे खरेदी करायला जातानासुद्धा आपण आपल्या मनात काही विशिष्ट रंग आधीच ठरवलेले असतात. फॅ शन क्षेत्रात कुठलेही कपडे अथवा अ‍ॅक्सेसरी लोकांना एकाच नजरेत पसंत पडायला हवी असेल तर त्या वस्तूंचा ‘रंग’ हा आजच्या घडीला केंद्रबिंदू मानला जातो. ‘इंटरनॅशनल कलर ऑथॉरिटी’च्या म्हणण्याप्रमाणे तर ग्राहकाची लगेचच प्रतिक्रिया मिळण्यामागे त्या कपडय़ाची स्टाइल आणि किमतीपेक्षा त्याचा रंग जास्त महत्त्वाचा असतो. म्हणूनच फॅ शन आणि टेक्सटाइल इंडस्ट्रीत कुठल्याही कपडय़ाची स्टाइल आणि त्याच्यावरचे डिझाइन फोरकास्ट करण्याआधी त्या सीझनचे ‘कलर फोरकास्ट’ आधी होते. हे कलर फोरकास्ट म्हणजे नेमके काय? ते का केले जाते? कसे केले जाते? ते करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कुठले मुद्दे लक्षात घ्यावेत या सर्व महत्त्वाच्या गोष्टींवर आज एक छोटीशी नजर टाकूयात.

कुठलाही कपडा असो, ताग्यातील कापड, साडी असो, पलंगावर घालायच्या चादरी किंवा मग एक साधा नॅपकीनही; या सर्व गोष्टी खरेदी करताना त्याचे दृश्यस्वरूप म्हणजेच रंगसंगती हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त शस्त्र मानले जाते. साधारणपणे बघायला गेलं तर आपण जेव्हा केव्हा खरेदीला जातो तेव्हा आपल्याकडे जे कपडे-वस्तू आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी हव्या असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे जर लाल टीशर्ट असेल तर तो नवीन टीशर्ट घेताना आपोआप वेगळ्या रंगाचा बघेल किंवा आपल्या घरात आपणही कधी एकाच रंगाचे आणि डिझाइनचे पडदे बनवत नाही. म्हणूनच ‘चेंज इज कॉन्स्टन्ट’ असं मानलं जातं. प्रत्येक रंगाचे एक स्वत:चे वैशिष्ट असल्यामुळे वेगवेगळ्या रंगाचे कपडे आपले त्या त्या वेळचे आंतर्बाह्य़ स्वरूप ठरवते. साधारणपणे बघायचं झालं तर आज मला बाहेर फिरायला जायचं आहे म्हणून मी छान फ्रेश ब्राइट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला, पण एका फॉर्मल मीटिंगला जाताना मी बेज, काळा, पांढरा, नेव्ही ब्लू या रंगाचे कपडे घालणे पसंत करीन; किंवा मग आपला मूड बरा नसेल तर आपण आपोआप डल रंगाचे कपडे घालतो. जर कधी आपण आपल्या घरातले पडदे, भिंतीवरचा रंग, सोफ्याचा रंग निरखून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्या रंगसंगतीमुळे त्या घरातील खोल्यांना पण एक स्वत:चं व्यक्तिमत्त्व मिळालं आहे. अशाप्रकारे आपल्या रोजच्या जीवनात रंग हे आपल्याला बरंच काही सांगून जातात. एक ग्राहक म्हणून आपल्याला जेव्हा दुकानात एकाच रंगातील सर्व प्रकारचे कपडे कंटाळवाणे वाटतात त्याचप्रमाणे कपडय़ात रंगांचे अतिजास्त दिले गेलेले पर्यायही ग्राहकांना गोंधळवून टाकतात. त्यामुळे ग्राहकांची कपडे खरेदीची इच्छाच निघून जाऊ शकते. म्हणूनच काही नेमके रंग निवडून, त्याचे कपडे बनवून घेणे, लोकांमध्ये कपडे घेण्याची गरज निर्माण करण्यासाठी आणि बाजारात त्याचा जास्तीत जास्त खप वाढवण्यासाठी फॅ शन व टेक्स्टाइल इंडस्ट्रीत ‘कलर फोरकास्ट’ ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते.

‘कलर फोरकास्टिंग’ म्हणजे काय तर एका विशिष्ट वर्षांतील ऋतूत आपण आपल्या रोजच्या दिनचर्येतील सगळ्या प्रकारच्या पेहरावांवरील, टेक्स्टाइल्सवरील आणि संबंधित वस्तूंवरील सर्वात जास्त आवडती आणि वापरली जाणारी रंगसंगती. त्यावरील डिजाइन्सचा एका विशिष्ट कार्यपद्धतीप्रमाणे त्या ऋतूच्या आगमनाच्या जवळपास एक ते दोन वर्षे अगोदरच अंदाज लावणे. या प्रक्रियेत मुळात सामान्य लोकांना आवडतील अशा काही निवडक रंगांचा अंदाज लावण्यासाठी फोरकास्टर प्रथम विविध माहिती/कलर फोरकास्ट डेटा गोळा करतो. मग त्याचे मूल्यांकन व विश्लेषण करतो आणि शेवटी त्याचा अर्थ लावून ते रंग आणि रंगसंगती त्या ठरावीक सीझनसाठी निश्चित करतो. ‘कलर फोरकास्ट डेटा’ म्हणजे गेल्या वर्षांतील जागतिक आणि राष्ट्रीय स्थरावरच्या सामाजिक, आर्थिक, राजनीतिक घडामोडींचा अभ्यास करणे आणि त्याचा भावनिक व व्यावसायिक पातळीवर ग्राहक आणि उद्योजकांवर काय परिणाम झाला याचे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे. याचबरोबर फॉर्मल, कॅ ज्युअल, फेस्टीव, पार्टीवेअर या विविध प्रकारच्या पेहरावांमध्ये लोकांच्या आवडीनिवडी कशा बदलतात, मागील वर्षांतील कोणते रंग आणि प्रिंट्स किती पॉप्युलर झाले. त्यातील कुठले रंग/ प्रिंट्स/ पॅटर्न्‍स त्याच्या पुढच्या सीजनमध्ये पण सुरू ठेवू शकतो याचाही अभ्यास करावा. उदाहरणार्थ, २००९ पर्यंत लोकांचा कल जरा उठावदार/ ब्राइट आणि पेस्टल रंगांकडे होता, पण त्याच वर्षी प्रख्यात भूगर्भ आणि जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या द्विशतकीय जन्मदिवस उत्सवानंतर लोकांचा कल निसर्ग, वाइल्ड लाइफकडे असल्यामुळे अचानक त्यांची पेहरावामधली आवड अर्दी कलर्स, बोटॅनिकल प्रिंट्स, ट्रायबल प्रिंट्स आणि हस्तकलेतील कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजकडे झुकत गेली. तसंच २००८-२००९ मधील आर्थिक संकटामुळे सोनं, चांदी, प्लॅटेनियमचे भाव वाढल्यामुळे मेटालिक प्रिंट्स किंवा मेटालिक फिनिशवाले टी-शर्ट्स, शर्ट्स, शूज, इत्यादी अशी अनेक उत्पादने पुढची काही वर्षे फॅशनमध्ये होती. हा डेटा एका स्क्रॅपबुकमध्ये फोटोग्राफ्स, मासिक आणि वर्तमानपत्रातील कात्रणे अशा विविध स्रोतांद्वारे गोळा केला जातो आणि मग त्याचे कोलाज केले जाते. अशाप्रकारे ‘कलर फोरकास्टिंग’ हे म्हणजे कला आणि शास्त्राचा योग्य मिलाप आहे. हे एका व्यक्तीचं काम नसून ते कार्य उत्तमरीत्या आणि वेळेत पार पडणाऱ्या जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अनेक संस्था आणि कंपनी आहेत.

उदाहरणार्थ, ‘इंटरनॅशनल कलर ऑथॉरिटी’, ‘डिझाइन इंटेलिजन्स’ (लंडन), कार्लीन इंटरनॅशनल (पॅरिस) जे पुढे येणाऱ्या सीझन किंवा वर्षांतील कलर ट्रेंड्सची योग्य माहिती मोठय़ा ब्रॅंड्स, उद्योजक आणि डिझायनर्सना वेळेत पुरवतात; आणि मगच सर्वसामान्य लोकांसमोर या कलर ट्रेंड्सप्रमाणे नवीन फॅ शनचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध होतात. यात सहभागी असलेल्या प्रत्येक फोरकास्टरने आपले कान आणि डोळे सतत उघडे ठेवणे गरजेचे असते. त्याचबरोबर जागतिक आणि राष्ट्रीय घडामोडींवर सतत लक्ष ठेवणे, वेगवेगळ्या देशांमध्ये फिरणे, तेथील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला इत्यादी क्षेत्रातील घडामोडी, त्याचा लोकांवर होणारा परिणाम याचे निरीक्षण करावे लागते. शिवाय डिझाइनर्स, ब्रॅंड्स आणि उद्योजकांच्या उत्पादनाला ग्राहक आणि विक्रेते कसे प्रतिसाद देतात यावर पण पुढील सीझनचा कलर फोरकास्ट अवलंबून असतो. प्रेरणा, सर्जनशीलता, दूरदृष्टी हे या कामाचे मूळ घटक आहेत. एक उत्तम फोरकास्टर कायम या मूळ घटकांचा योग्य समतोल साधतो. म्हणूनच कलर फोरकास्टिंग हा फक्त फॅ शन नव्हे तर डिझाइनिंगमधील प्रत्येक क्षेत्राचा भक्कम पाया मानला जातो.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles about fashion industry