मृण्मयी पाथरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहानपणापासूनच मैथिली शाळेत अभ्यास, निरनिराळय़ा कला, खेळ अशा सगळय़ाच गोष्टींत पुढे असायची. तिच्यातली विविध कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून तिचे आई-बाबा तिला चित्रकला, कथ्थक, कराटे, जिम्नॅस्टिक्स अशा निरनिराळय़ा क्लासेसना आवर्जून पाठवायचे. शाळेतील आणि घरातील सगळीच मंडळी तिचं खूप कौतुक करायची. तिच्या यशाची, जिद्दीची, टापटीपपणाची आणि वेळेच्या नियोजनाची उदाहरणं इतर समवयस्क मुलांना नेहमी दिली जायची. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरही ती प्राध्यापकांची लाडकी विद्यार्थिनी होती. एक्स्ट्रा-करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेणं, कॉलेजमधील फेस्टिव्हल्सच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारणं, विविध स्पर्धा परीक्षांना बसणं यात मैथिली नेहमीच पुढे असायची. पण जसजशी मैथिली मोठी होत गेली, तसतशी तिचं कौतुक करणाऱ्या मंडळींची संख्या कमी कमी होत गेली. ‘लहानपणापासूनच खूप हुशार आहे मैथिली. त्यामुळे तिने आतापर्यंत यशाची जी शिखरं गाठली आहेत ती गाठणं तर तिच्याकडून अपेक्षितच होतं..’ असं प्रत्येक जण म्हणू लागला. पुढे मैथिलीला उत्तम नोकरीही लागली. नोकरीमुळे आर्थिक स्थैर्यही आलं, पण मैथिली मात्र तिला सगळं काही मनासारखं मिळूनही आनंदी नव्हती.    

मैथिली लहान असताना तिच्या भोवतालच्या मंडळींनी तिने सगळय़ा गोष्टींत अग्रेसर ठरावं म्हणून तिच्यावर कधीच जाणूनबुजून दबाव टाकलेला नव्हता. मैथिलीचा सर्वागीण विकास व्हावा हीच तेवढी तिच्या आई-बाबांची अपेक्षा होती. पण गंमत म्हणजे मैथिलीचं कौतुक तेव्हाच केलं जायचं, जेव्हा ती एखादी गोष्ट साध्य (achieve) करायची. त्यामुळे कौतुकाची थाप मिळवायची असेल तर आपल्याला काही ना काहीतरी अचिव्ह केलंच पाहिजे, नाहीतर बाकीचे आपल्यामुळे डिसअपॉइंट होतील, हे समीकरण हळूहळू मैथिलीच्या मनात पक्कं होऊ लागलं. या काळात मैथिलीच्या हातून काही बारीकसारीक चुका झाल्या तरी तिला स्वत:चाच खूप राग येत असे आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट कशी करता येईल याकडे ती अजूनच डोळय़ात तेल घालून लक्ष देत असे. या परफेक्शनिझममुळे कॉलेज किंवा ऑफिसचे ग्रुप प्रोजेक्ट्स करताना तिच्या ग्रुपमधील मंडळींनी तिच्या अपेक्षेनुसार प्रोजेक्ट पूर्ण केला नाही तर मैथिलीचा जीव कासावीस होत असे. तिला हवी तशी एखादी गोष्ट झाली नाही तर तिची चिडचिड वाढू लागली. आपल्या गुणवत्तेच्या निकषांनुसार इतर लोक काम करत नसतील तर फायनल प्रॉडक्ट परफेक्ट व्हावं यासाठी इतरांच्या वाटणीची कामंही मैथिली मग स्वत:च करू लागली.

जॉब करता करता मैथिलीने पुढे पीएच.डी.

(Ph.  D.) साठी भारताबाहेरील अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये  रिसर्च प्रपोजल पाठवून अर्ज केले. तिच्या आवडीच्या टॉप तीन विद्यापीठांपैकी एका विद्यापीठामध्ये तिचा अर्ज मंजूरही झाला. ही बातमी ऐकून तिच्या निकटची सगळी मंडळी खूप खूश झाली, मात्र मैथिलीला याचा हवा तसा आनंद अनुभवता आला नाही. तिच्या टू-डू लिस्टमधील प्रत्येक गोष्ट साध्य झाली की ती नेहमी पुढच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायची. असं करता करता तिने तिची अनेक ध्येयं गाठली, पण त्या ध्येयपूर्तीचा आनंद अनुभवण्यासाठी ती नेहमी घाबरायची. ‘मला आता यश मिळालं आणि मी सगळय़ांसोबत आनंद व्यक्त केला, पण पुढच्या वेळेस मी अपयशाला सामोरं गेले तर..? मला लोक हसतील ना? मी आतापर्यंत अचिव्ह केलेल्या गोष्टी केवळ लकमुळे साध्य झाल्यात असं लोक म्हणाले तर..?’अशा शंका – कुशंकांबद्दल ती सतत विचार करत बसायची. हळूहळू या शंकांचा तिच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ लागला. इतरांनी तिचं कितीही कौतुक केलं तरी ते कौतुक करायचं म्हणून करत आहेत. माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल काय म्हणत असतील, कुणास ठाऊक!’ असे आपण ‘इम्पोस्टर’ (imposter) असल्यासारखे विचार मैथिलीच्या मनात डोकं वर काढू लागले.      

आपल्या सगळय़ांचं आयुष्य अगदी हुबेहूब मैथिलीसारखं नसलं तरी तिच्या जीवनातील काही गोष्टी आपणही कधी कधी कळत – नकळत अनुभवल्या असतील. आपण जसजसे मोठे होत जातो, तसतसे आपल्या सभोवतालच्या माणसांना आपण कोणत्या गोष्टी केल्या तर आवडतील याचे आडाखे बांधायला आपण सुरुवात करतो. ही प्रक्रिया खरं तर आपण पाळण्यात असल्यापासूनच आपसूक सुरू होते. या निरीक्षणातून आपण इतरांना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात याचे ठोकताळे बांधू लागतो. पुढे यापैकी काही ठोकताळे आपल्या स्व-मूल्यमापनाचे निकष (self- assessment criteria) बनतात. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्सनी या निकषांना ‘कंडिशन्स ऑफ वर्थ’ (conditions of worth) असं नाव दिलं आहे. या कंडिशन्सची काही उदाहरणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक समस्या कितीही उद्भवल्या तरी अभ्यास आणि कामात आपण कायम अग्रेसर राहावं, रक्ताची किंवा लग्नामुळे निर्माण झालेली नाती कितीही ‘टॉक्सिक’ असली तरी ती टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी अशा अपेक्षा बाळगणं आणि इतरांनीही त्या अपेक्षांनुसार वागावं, हा अट्टहास सुरू होतो.

बरं, या ‘कंडिशन्स ऑफ वर्थ’ कालांतराने कमी होण्याऐवजी वाढतच जातात. आपण स्वत:ला आणि इतरांना एक ‘परफेक्ट’ मूल, विद्यार्थी, कर्मचारी, उद्योजक,  पालक, आजी/ आजोबा अशा विविध भूमिकांमध्ये आजमावत राहतो. या ‘परफेक्ट’ भूमिका निभावताना ज्या क्षणांची आपण काही महिने किंवा र्वष आतुरतेने वाट पाहत असतो, ते क्षण आपल्या आयुष्यात येतातसुद्धा; परंतु आपल्याला त्यांचा मनसोक्त आनंद मात्र घेता येत नाही. आपण भविष्याबद्दलची चिंता आणि लोक काय म्हणतील, या भीतीच्या सावटाखाली इतके गुरफटून जातो की आपल्यासमोर असलेले आनंदाचे क्षण हातातल्या वाळूसारखे निसटून जातात. आपलं लक्ष समोर आलेल्या सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टींकडेच जास्त वळतं. मूलत: या ‘कंडिशन्स ऑफ वर्थ’ कायम वाईटच असतात असं नाही. या कंडिशन्स बहुतेकदा आपल्या जीवनाला अर्थही प्राप्त करून देत असतात. पण जेव्हा आपण या कंडिशन्सना काळय़ा दगडावरची रेघ मानून चालतो, तेव्हा आपल्या आयुष्यात अ-लवचिकता (rigidity  किंवा  inflexibility) येण्याची शक्यता बळावते. त्यामुळे आपण एखादी गोष्ट साध्य नाही केली, तर आपले पालक, नातेवाईक किंवा जोडीदार आपल्यावर प्रेम करणार नाही असंही काहींना वाटत राहतं आणि परफेक्शनिझमचं हे चक्र अव्याहत सुरूच राहतं. या चक्रातून बाहेर येण्यासाठी आपलं या जगात एक व्यक्ती म्हणून असलेलं मूल्य हे केवळ आपल्या कामगिरीवर किंवा अचिव्हमेंटवर अवलंबून नाही, हे जरूर लक्षात ठेवायला हवं.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man spandane author mrunmayi pathre perfectionist study school art sports financial stability job ysh