फार मोठे घबाड मिळेल या आशेने तयार करण्यात आलेला पुणे शहराचा घसघशीत विकास आराखडा हा फक्त बिल्डरांचे हित जपणारा असून या आराखडय़ाला देण्यात आलेल्या सर्व घातक उपसूचना आम्ही कोणत्याही परिस्थितीत रद्द करायला लावू, असा इशारा शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी घातक उपसूचना दिल्या असे लक्षात आले, तर त्या उपसूचना देखील रद्द करू, असेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ाला शिवसेनेने विरोध जाहीर केला असून शहर उद्ध्वस्त करणारा हा आराखडा शिवसेनेला मान्य नाही, अशी भूमिका सुभाष देसाई यांनी शुक्रवारी जाहीर केली. विकास आराखडय़ाला ज्या उपसूचना देण्यात आल्या, तसेच विकास नियंत्रण नियमावलीत जे बदल करण्यात आले, ते अत्यंत घातक आहेत. अशा सर्व उपसूचनांचा व नियम बदलाचा अभ्यास आम्ही करत आहोत. त्या रद्द करण्याचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार असून आराखडय़ाच्या विरोधात व्यापक चळवळही उभी केली जाईल. शिवसेनेच्या नगरसेवकांनी घातक उपसूचना दिल्या आहेत असे लक्षात आले, तर त्या देखील आम्ही रद्द करायला लावू, असेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरासाठी तयार करण्यात आलेला हा आराखडा सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने भूखंड माफिया आणि बिल्डरांसाठीच तयार करण्यात आल्याचे सांगून देसाई म्हणाले की, या आराखडय़ातील विकासकामे प्रत्यक्षात आणण्यासाठी २५ हजार कोटी रुपये लागणार आहेत आणि हे पैसे कोठून उभे करायचे याची काहीही योजना नाही. त्यामुळे फक्त मोठे घबाड मिळेल याच उद्देशाने अनेक योजनांचा समावेश असलेला हा आराखडा तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. या आराखडय़ानुसार एफएसआय वापरला गेल्यास शहराची लोकसंख्या फार मोठय़ा प्रमाणात वाढेल आणि मूळ पुणेकर शहरातून हद्दपार होतील. तसेच येथे परप्रांतीय उपऱ्यांचे प्रमाण वाढेल. शहराची वाढ अशी अतिवेगाने होता कामा नये. जसजशा सुविधा उपलब्ध होतील तसतशी लोकसंख्या वाढली पाहिजे, असेही देसाई म्हणाले. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, विजय शिवतरे, गटनेता अशोक हरणावळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘..तर नगरसेवकांवरही कारवाई’
विकास आराखडय़ाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सभेत शिवसेनेचे काही नगरसेवक मतदानात अनुपस्थित होते, तसेच काही नगरसेवकांनी बिल्डरच्या लाभासाठी, स्वार्थी हेतूने काही उपसूचना मंजूर करवून घेतल्या, अशा काही गोष्टी कानावर आल्या असून त्याची अत्यंत गंभीर दखल आम्ही घेतली आहे. याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागवला जाईल आणि कारवाई देखील केली जाईल, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All danger and selfish sub notice preasure for cancellation subhash desai