लष्कराच्या यांत्रिकी पायदळाच्या प्रात्यक्षिकात निमंत्रित पाहुण्यांनी युद्धाची थरारकता तर अनुभवलीच, मात्र देशाच्या संरक्षणसिद्धतेची चुणूकही ‘याची देही याची डोळा’ पाहिली. विविध देशांमधील ५० लष्करी अधिकाऱ्यांनीही जवानांच्या अचुकतेला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
नगरस्थित आर्मर्ड कोअर अॅन्ड सेंटर व यांत्रिकी पायदळ ही लष्कराची देशातील एकमेव प्रशिक्षण केंद्र आहेत. या केंद्रांच्या वतीने नगरजवळील खारेकर्जुने (केके रेंज) सराव क्षेत्रात आज सकाळी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. संरक्षण सेवा स्टाफ महाविद्यालयाचे (वेलिंग्टन) प्रमुख मेजर जनरल रवि थोडगे यांच्यासह अतिविशिष्ट, विशिष्ट सेवापदक विजेते अधिकारी, देशातील निवडक २२५ व परदेशी ५० लष्करी अधिकारी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.
सराव प्रात्यक्षिकाच्या सुरूवातीलाच रणगाडय़ावरून गगनभेदी क्षेपणास्त्र डागून या जवानांनी पाहुण्यांना सलामी दिली. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून झेपावलेल्या सुखोई या दोन अत्याधुनिक लढाऊ विमानांनी सराव क्षेत्रावर दोन घिरटय़ा घालत हवाई संरक्षण सज्जतेचीही चुणूक दाखवली. प्रामुख्याने रणगाडय़ांवरून लक्ष्यभेद करण्याची प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. अर्जुन, भीष्म अशा नव्या पिढीतील अत्याधुनिक रणगाडय़ांवरील क्षेपणास्त्रांनी एक किलोमीटरपासून पाच किलोमीटपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक परंतु सहज भेद करीत पाहुण्यांसह उपस्थितांची वाहवा मिळवली. कानठळ्या बसवणारा आवाज, लक्ष्य भेदल्यानंतर सुरूवातीला उठणारे आगीचे व नंतर धुराचे लोळ पाहून युध्दभूमीचीच अनुभूती उपस्थितांनी घेतली. जवळच्याच विळद गावाला प्रतिकात्मक लक्ष्य करीत या जवानांनी ते यशस्वीरीत्या काबीज करत या प्रात्यक्षिकांची सांगता केली. विधिध प्रकारचा दारूगोळा, बाँब, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शनही येथे मांडण्यात आले होते. ते पाहण्यासाठीही उपस्थितांनी गर्दी केली. पाहुणे व नागरिकांनी यावेळी रणगाडय़ातून सफरीचा थरारही अनुभवला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2013 रोजी प्रकाशित
संरक्षणसिद्धतेचा थरार!
लष्कराच्या यांत्रिकी पायदळाच्या प्रात्यक्षिकात निमंत्रित पाहुण्यांनी युद्धाची थरारकता तर अनुभवलीच, मात्र देशाच्या संरक्षणसिद्धतेची चुणूकही ‘याची देही याची डोळा’ पाहिली. विविध देशांमधील ५० लष्करी अधिकाऱ्यांनीही जवानांच्या अचुकतेला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-01-2013 at 03:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defence ready terror demonstration