सोलापूर विद्यापीठाचा नावलौकिक निर्माण करण्यासाठी आणि त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सोलापूरची स्वतंत्र ओळख प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सोलापूर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली.
मावळते कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांचा कालावधी गेल्या २५ नोव्हेंबर रोजी संपल्यामुळे नवा कुलगुरू नियुक्त होण्यासाठी कुलगुरू शोध समितीने देशभरातून अर्ज मागविले होते. त्यांच्या मुलाखती मुंबईत झाल्या. त्यातून पाचजणांच्या नावांची अंतिम यादी कुलपतींकडे सादर करण्यात आली होती. अंतिम यादीमध्ये डॉ. मालदार यांच्यासह औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठातील डॉ. वि. ल. धारूरकर, लखनौचे डॉ. गोडबोले, डॉ. रोहित कालिवाल (कर्नाटक), डॉ. बी. ए. चोपडे यांचा समावेश होता. या पाच उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या गेल्या. त्यातून कुलपती के. शंकरनारायणन यांनी डॉ. मालदार यांची कुलगुरुपदी निवड जाहीर केली. त्यांनी मंगळवारी दुपारी सोलापूर विद्यापीठात कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतली.
संपूर्ण देशात एकाच जिल्ह्य़ाचे कार्यक्षेत्र असलेले सोलापूर विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. २००४ साली सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील हे अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूर विद्यापीठाची निर्मिती केली होती. या विद्यापीठाला पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी हे लाभले. तर दुसरे कुलगुरू म्हणून डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी काम पाहिले. आता तिसरे कुलगुरू डॉ. नूरमोहम्मद मालदार हेदेखील सोलापूरचेच आहेत. याच विद्यापीठात त्यांनी रसायनशास्त्र विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
१६ नोव्हेबर १९५३ रोजी जन्म झालेले डॉ. मालदार यांनी रसायनशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले आहे. सेऊलच्या हानयांग विद्यापीठात प्राध्यापकपदावर काम केल्याचा अनुभव असलेले डॉ. मालदार यांनी ३५ वर्षे संशोधनात तर २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात अनुभव संपादन केला आहे. इम्पॅक्ट फॅक्टर, पॉलिमर सिंथेसिस, मॉडिफिशन, हाय परफार्मन्स इंजिनिअरिंग प्लास्टिक आदी विषयांवर त्यांनी लिहिलेले १३६ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. पुण्याच्या राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत त्यांनी कनिष्ठ संशोधक ते सहयोगी संशोधकपदापर्यंत सेवा केली आहे. अमेरिकेतील डलासच्या साऊथर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटी तसेच युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोन येथे पोस्ट डॉक्टर्स रिसर्च फेलोशिप, शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर विभागाचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या रूपाने एक कार्यक्षम व सचोटीचा कुलगुरू सोलापूर विद्यापीठाला लाभल्यामुळे त्यांचे सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रात स्वागत होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
सोलापूर विद्यापीठाचा लौकिक निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार
सोलापूर विद्यापीठाचा नावलौकिक निर्माण करण्यासाठी आणि त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सोलापूरची स्वतंत्र ओळख प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सोलापूर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-12-2012 at 08:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For good reputation of solapur university i will try best chancellor