अगदी सात-आठ वर्षांपूर्वी कल्याण तालुक्यातील पुई हे ठाणे जिल्ह्य़ातील इतर गावांप्रमाणेच एक होते. पावसाळ्यात भात पिकविणारे आणि उर्वरित काळात उदरनिर्वाहासाठी शहरात मोलमजुरी करणारे. मात्र २००६ पासून उन्हाळ्यात उजाड राहणाऱ्या जमिनीत गावकऱ्यांनी सामूहिकरीत्या भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली आणि गावात समृद्धी आली. त्यातही विशेषत: भेंडीने पुई गावाची भाग्यरेखाच बदलली. सध्या या गावातून कल्याणच्या बाजारात दररोज सरासरी ३५ क्विंटल भेंडी येते.
पुई हे कल्याण तालुक्यातील बारवी नदीकाठचे गाव. गावाशेजारी नदी असल्याने उन्हाळ्यात कोरडी असणारी जमीन ओलिताखाली आणून भाताव्यतिरिक्त अन्य पिके घेणे शक्य असल्याचे काही गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी श्रीसमर्थ हा पुरुष गट स्थापन करून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले आणि सिंचन योजना राबवली. त्यामुळे गावातील तब्बल दीडशे एकर जागा ओलिताखाली येऊन एरवी उजाड असणाऱ्या जागेत हिरवाई दिसू लागली. गावकऱ्यांनी त्यांच्या शेतात भाजीपाला लागवड करण्यास प्राधान्य दिले. टॉमेटो, ढोबळी मिरची, कांदा, वांगी, काकडी आदी भाज्यांची लागवड येथील शेतकरी करीत असले तरी कल्याणच्या मंडईत पुई गाव ओळखले जाते ते तिथल्या भेंडीमुळे. पुई गावच्या भेंडीला बाजारात चांगला भाव आणि मान आहे. स्थानिक बाजारपेठेप्रमाणेच ही भेंडी आखाती प्रदेश, युरोप तसेच अमेरिकेतही गेली आहे. गेल्या वर्षांपासून मात्र परदेशी व्यापारी सेंद्रिय पिकाचा आग्रह धरू लागल्याने यंदा येथील भेंडी निर्यात झाली नसली तरी पुढील वर्षी जास्तीतजास्त भाजी लागवड सेंद्रिय पद्धतीने करण्याचा निर्धार येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
उत्तम शेतीचा प्रत्यय
भेंडी लागवडीने ‘उत्तम शेती’ची प्रचिती आल्याने शिक्षक असणाऱ्या गुरुनाथ सांबरे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन आता पूर्णवेळ शेती पत्करली आहे. त्यांनी २००१ मध्ये गावातील २५ शेतकऱ्यांचा गट करून भाजीपाला लागवड सुरू केली.
त्यानंतर बचत गट स्थापन झाला. कृषी खात्याने गावास शहरालगत भाजीपाला लागवड योजनेतून २८ लाखांचे अनुदानही दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा हुरूप वाढला. आता सांबरेंसारखे गावातील काही तरुण रितसर प्रशिक्षण घेऊन जास्तीतजास्त पीक घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
चार महिन्यांत एक कोटीचे उत्पन्न
भेंडीमुळे पुई गावचे अर्थकारणच बदलले आहे. सध्या गावातील बहुतेक शेतकरी भेंडी लागवड करतात. गावातील दीडशे एकर जागेत भेंडी लागवड करण्यात आली आहे. नारायण आणि निर्मला या गावातील वयोवृद्ध घोडविंदे दाम्पत्याने त्यांच्या एक एकर जागेत भेंडी लागवड केली आहे. डिसेंबर महिन्यात भेंडीची लागवड केली जाते आणि फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात भेंडीचे पीक येते. या चार महिन्यात सर्व खर्च वजा जाऊन एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती नारायण घोडविंदे यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली. भेंडी खुडण्यासाठी खाऊनपिऊन रोज दीडशे रुपये मजुरी मिळत असल्याने येथील मजुरांना त्यासाठी आता बाहेर जावे लागत नाही. या चार महिन्यात भेंडी पुई गावास साधारण एक कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवून देते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2013 रोजी प्रकाशित
भेंडीने बदलली पुई गावची भाग्यरेखा.!
अगदी सात-आठ वर्षांपूर्वी कल्याण तालुक्यातील पुई हे ठाणे जिल्ह्य़ातील इतर गावांप्रमाणेच एक होते. पावसाळ्यात भात पिकविणारे आणि उर्वरित काळात उदरनिर्वाहासाठी शहरात मोलमजुरी करणारे. मात्र २००६ पासून उन्हाळ्यात उजाड राहणाऱ्या जमिनीत गावकऱ्यांनी सामूहिकरीत्या भाजीपाला लागवड करण्यास

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pui village towards sucess because of ladyfinger crop