शहरातील गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळू शकेल, अशा ‘शेल्टर २०१२’ प्रदर्शनाला येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ‘क्रेडाई’च्या वतीने आयोजित या प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वास आली असून दुपारी चार वाजता महापौर अॅड. यतिन वाघ आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली. प्रदर्शनाचा समारोप २३ डिसेंबर रोजी होणार आहे.
शहरातील स्थावर मालमत्ताविषयक संपूर्ण माहिती देणारे आणि दर दोन वर्षांनी भरविलेले शेल्टरचे हे सहावे प्रदर्शन आहे. यंदा या प्रदर्शनाची ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. भविष्यातील नाशिकची झलक दाखविणारे प्रवेशव्दार या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. १२० फूट रुंद आणि ३० फूट उंच असे हे प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. क्रेडाईचे सदस्य असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या नाशिकमधील गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. प्लॉट, फ्लॅट, बंगला, रो-हाऊस, जागा यासारख्या तीन हजारांपेक्षा अधिक मालमत्तेची माहिती येथे मिळू शकेल. गृह प्रकल्पाशी संबंधित साहित्य पुरवठादार, होम सिक्युरिटी, सॅनिटरी वेअर, गृह सजावट याविषयीचेही स्टॉल्स येथे राहाणार आहेत. २५० पेक्षा अधिक विविध प्रकारचे स्टॉल्स राहाणार आहेत. प्रदर्शनाकरिता स्टेट बँक प्लॅटिनम प्रायोजक आहे. प्रदर्शनात गृह कर्ज घेणाऱ्यांना बेस रेटने बँकेच्या वतीने कर्ज देण्यात येणार आहे. प्रदर्शनात १२ लाखांपासून कोटीपर्यंत अशी किंमत असणाऱ्या घरांची माहिती मिळू शकणार आहे. प्रदर्शनाची माहिती इतर ठिकाणच्या नागरिकांनाही मिळावी तसेच शहरातील कोणत्या भागात घर किंवा प्लॉट उपलब्ध आहे, त्याची माहिती घरीही शोधता यावी, यासाठी शेल्टरचे संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे. भौगोलिकदृष्टय़ा नाशिकचे स्थान, हवामान, दळणवळणासाठी अतिशय योग्य, या गोष्टींचा विचार करता भविष्यात नाशिकची प्रगती अधिक वेगाने होण्याची चिन्हे असल्याने मुंबई, पुणे, ठाणे येथील रहिवासीही मालमत्ता घेण्यासाठी नाशिकला प्राधान्य देऊ लागली असल्याची माहिती या प्रदर्शनाच्या निमित्ताने देण्यात आली.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही मुंबई व पुण्यानंतर नाशिकलाच विकासाची अधिक संधी असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही शहराची अशी एक ओळख असते. ती ओळख विकासाच्या वाटेवर नाशिकने गमावू नये, अशी अपेक्षाही त्यांनी याआधीच व्यक्त केली आहे. शेल्टर प्रदर्शनाचा नाशिकसह इतर शहरांमधील नागरिकांनाही फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले. अधिकाधिक नाशिककरांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२५३- २५७०७२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘शेल्टर २०१२’ गृहप्रकल्प प्रदर्शनाचे आज उद्घाटन
शहरातील गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळू शकेल, अशा ‘शेल्टर २०१२’ प्रदर्शनाला येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर गुरुवारपासून सुरुवात होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-12-2012 at 03:03 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shelter 2012 home project exhibition opening today