राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) रामटेकडी येथील ग्रुप ‘एक’ मधील जवानाचा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास धावण्याच्या सरावादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. ह्रदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
प्रकाश खंबाजी गोंडावळे (वय २८, रा. राज्य राखीव दल ग्रुप एक वसाहत, रामटेकडी, मूळगाव- नाटंबी भोर) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. प्रकाश याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हा सहा वर्षांपूर्वी एसआरपीएफ मध्ये भरती झाला होता. तो एसआरपीएफच्या ग्रुप एकमध्ये होता. शुक्रवारी सकाळी साडेसातशे जवान नेहमीप्रमाणे मैदानावर सराव करत होते. सरावादरम्यान मैदानावर प्रकाश अचानक कोसळला. ग्रुपच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबात परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले, ‘‘प्रकाशच्या मृत्यू प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.’’     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srp guard dead on ground while practise