Vinesh Phogat Olympics : भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ५० किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला. या सामन्यात विनेश फोगटने ५-० असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. आता बुधवारी (दि. ७ ऑगस्ट) विनेशचा अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँड बरोबर अंतिम सामना होणार आहे. सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर असलेल्या विनेश फोगटने आपल्या आईशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. विनेश फोगटने आपल्या आईला सुवर्णपदक जिंकून आणू, असे आश्वासन या कॉल दरम्यान दिले.

विनेश फोगट आणि तिच्या आईमध्ये अतिशय भावनिक असे बंध आहेत. याची माहिती खुद्द विनेशने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली होती. मागच्या वर्षी एकस्प्रेसच्या आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात बोलत असताना विनेशने आई आणि तिच्या नात्यातील विण घट्ट असल्याचे सांगितले होते. २०२३ साली विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर विनेश आयडिया एक्सचेंज कार्यक्रमास सहभागी झाली होती. तुझ्यात एवढे धाडस कुठून आले, हा प्रश्न विचारल्यानंतर विनेशने आपल्या आईबद्दल सांगितले होते.

हे वाचा >> Paris Olympics 2024: विनेश फोगटने अंतिम फेरीत धडक मारत घडवला इतिहास; ही कामगिरी करणारी ठरली पहिली महिला कुस्तीपटू

आमच्यावर अचानक आभाळ कोसळलं

विनेश म्हणाली, “माझ्या आईकडून मला हिंमत मिळते. आमचं मित्रांप्रमाणे घट्ट नातं आहे. आम्ही दोघी एकमेकांना सर्व सांगतो. ती ३२ वर्षांची असताना विधवा झाली. तिने आमच्यासाठी खूप संघर्ष केला. तिच्या संघर्षाच्या काळात आम्ही कधी मोठे झालो, कळलंच नाही. एकल माता म्हणून आम्हा भावंडाचे संगोपन करत असताना तिला समाजाचे टोमणे ऐकावे लागले. माझ्या वडिलांचे निधन होण्याआधी ती कधी घरातूनही बाहेर पडली नव्हती. टॉमोटाचा दर काय आहे? हेही तिला माहीत नव्हतं आणि अचानक एकेदिवशी आमच्यावर आभाळ कोसळलं.”

याच मुलाखतीमध्ये विनेश फोगटने आईच्या कर्करोगाबद्दलही भाष्य केले. कर्करोगावरील उपचारादरम्यान आईने दाखविलेली हिंमत माझ्यासाठी प्रेरणा देणारी ठरली, असं विनेश म्हणाली.

पॅरीस ऑलिम्पिक २०२४ मध्ये जपानच्या युई सुसाकीचा पराभव करताना विनेश फोगट

मीही आईसारखा संघर्ष करू शकते

“जेव्हा तिला कर्करोगाचे निदान झाले होते, तेव्हा तिला रोहतक येथे केमोथेरपी घेण्यासाठी जावं लागत होतं. निरक्षर असलेल्या आईला कुठं जावं, कुठं बसावं, हेही कळत नव्हतं. कुणी मदतीला नव्हतं. तिचा असा संघर्ष बघत बघत मी मोठी झाले. एक निरक्षर एकल माता समाजाशी संघर्ष करत करत आम्हाला कुस्तीपटू बनवते तर मग मीही तिच्यासारखा संघर्ष करू शकते”, अशी भावना विनेश फोगटने बोलून दाखवली.

हे ही वाचा >> Paris Olympics 2024: “याच मुलीला तिच्या देशात लाथेने चिरडण्यात…” बजरंग पुनियाची विनेश फोगटच्या विजयावर जळजळीत शब्दात टीका, पोस्ट व्हायरल

विनेश फोगट मागच्यावर्षीच्या आंदोलनाबाबत बोलताना म्हणाली, “जर आम्ही कुस्तीपटू अन्यायाच्या विरोधात बोललो नाही, तर मग माझ्या आईचा संघर्ष वाया जाईल. आम्ही पदक जिंकलोच. पण जर ही लढाई जिंकलो तर माझ्या आईला अधिक आनंद होईल. ती अभिमानाने म्हणेल की, मी हिला जन्म दिलाय. माझ्या आईने जो संघर्ष केला, त्याचा वारसा मला मिळाला आहे आणि याचा मला अभिमान वाटतो.”