नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांकडून पुढील आर्थिक वर्षांत महाविद्यालयात अखेरच्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या (कॅम्पस प्लेसमेंट) तसेच नवोदित तरुणांना नोकऱ्यांमध्ये २० टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपामधील मंदीच्या भीतीपोटी भारतीय माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांची नोकरभरतीची प्रक्रिया आधीच मंदावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या भारतीय माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना सध्या मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी गळतीच्या (अ‍ॅट्रिशन) वाढत्या समस्येने ग्रासले आहे. बडय़ा माहिती-तंत्रज्ञान कंपन्या सतत कुशल आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. कंपन्यांकडून अशा कर्मचाऱ्यांना मोठा वेतनमान देण्याचीही तयारी असते. कुशल आणि अनुभवी अशा दोन्ही गुणांचा मिलाफ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता हे या कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. देशात नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांनीही चांगलाच जोम धरला आहे. या तंत्रज्ञानधारित नवागत कंपन्या ग्राहकांना कमी दरात सेवा देत असल्याने त्यांच्याकडील कामात वाढ होत आहे. मात्र याचा फटका मोठय़ा कंपन्यांना बसतो. यामुळे यंदा नवोदितांच्या नोकरीभरतीमध्ये कपात केली जाण्याची शक्यता वाढली आहे.

इन्फोसिसकडून विद्यमान २०२२-२३ आर्थिक वर्षांत ५० हजार नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. तर विप्रो आणि टीसीएसकडून अनुक्रमे ३० हजार आणि ४० हजार लोकांना कामावर घेण्याची शक्यता आहे. टेक मिहद्र १५ हजार भरती करेल आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजकडून ४५ हजार लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती प्रस्ताव पाठवलेल्या अनेकांना अद्याप कंपनीत कामासाठी रुजू होण्यास सांगण्यात आलेले नाही. अनेक उमेदवारांनी समाजमाध्यमातून या मुद्दय़ाची वाच्यता केली आहे. करोनाची लाट ओसरल्यानंतर, कंपन्यांकडून फेब्रुवारी २०२२ पूर्वी नोकरीसाठी नियुक्ती प्रस्ताव-पत्र देण्यात आले होते, मात्र युक्रेन युद्धामुळे आणि महागाईमुळे कंपन्यांच्या नफ्याला कात्री लावणारा परिणाम, अशा प्रतिकूल घटकांनी पुढे अकस्मात डोके वर काढले.

नोकऱ्या घटणार किती?

उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये माहिती-तंत्रज्ञान आणि संलग्न सेवा क्षेत्रात सुमारे ४,७०,००० मनुष्यबळाला सामावून घेतले जाणार होते. पुढील आर्थिक वर्षांसाठी हा अंदाज ३,५०,००० ते ३,७०,००० पर्यंत कमी करण्यात आला. मात्र २०२३-२४ मध्ये, ज्याबद्दल भीती व्यक्त केली जाते ते मंदीचे ढग कायम राहिल्यास ही संख्या आणखी कमी होण्याची भीती आहे, असे मत नोकरभरती क्षेत्रातील कंपनी ‘हँड डिजिटल’चे संस्थापक सरन बालसुंदरम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiring slowdown in information technology sector in next year zws
First published on: 06-10-2022 at 04:02 IST