अजय वाळिंबे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उनो मिंडा इंडस्ट्रीज लिमिटेड ही एन.के. मिंडा समूहाची एक प्रमुख कंपनी असून भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण ऑटो अ‍ॅन्सिलरी उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीचे मुख्यालय हरियाणातील मानेसर येथे आहे. याचबरोबर पुणे आणि सोनेपत येथेही अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास केंद्रे आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानासह उनो मिंडा इंडस्ट्रीज ही ओईएम आणि ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सची अग्रगण्य टियर-१ पुरवठादार आहे. देशातील सर्वात मोठी स्विच प्लेअर उत्पादक तसेच हॉर्न उत्पादनात भारतातील सर्वात मोठी आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची उत्पादक आहे. तसेच कंपनी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी ऑटोमोटिव्ह लाइटिंग प्लेयर आहे. आपल्या विविध उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी उनो मिंडाने १४ जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे.

कंपनी दुचाकी तसेच चार चाकी वाहनांसाठी विविध सुटे भाग उत्पादित करते. कंपनीच्या उत्पादनाची विस्तृत श्रेणी असून यात प्रामुख्याने ओईएमसाठी २० हून अधिक उत्पादने आहेत ज्यात पर्यायी इंधन प्रणाली समाविष्ट आहे. कंपनी एअर बॅग, एअर फिल्टरेशन सिस्टिम, ब्रेक होसेस आणि इंधन होसेस, एकत्रित ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस), नॉइज सप्रेसर कॅप, पिंट्रेड सर्किट बोर्डस इ. अनेक उत्पादनात अग्रेसर आहे. देशांतर्गत प्रमुख ग्राहकांमध्ये मारुती सुझुकीबरोबर बजाज, होंडा मोटरसायकल, हीरो मोटोकॉर्प, रॉयल एनफिल्ड, यामाहा मोटर्स आणि पियाजिओ यांचा समावेश होतो.

जून २०२२ अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी उनो मिंडाने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत उलाढालीत ५९ टक्के वाढ साध्य करून ती २,५५५ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ८०० टक्के वाढ होऊन तो १३८.७९ कोटींवर पोहोचला आहे. आपला विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवण्यासाठी कंपनीने महत्त्वाची अधिग्रहण करून तांत्रिक भागीदाराच्या साहाय्याने अनेकविध प्रकल्प राबवत आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी क्यूआयपीद्वारे ७०० कोटी उभारले आहेत. गेल्याच आर्थिक वर्षांत कंपनीने हरिता सीटिंग या कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये जर्मन तंत्रज्ञान कंपनी फ्रिवो एजीसोबत विद्युत वाहने (ईव्ही) उद्योगात प्रवेश केला. या संयुक्त उपक्रमामुळे ईव्ही उद्योगात उनो मिंडाची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढेल अशी अपेक्षा आहे. इतर युक्त उपक्रमामध्ये अलॉय व्हीलसाठी कोसेई ग्रुप, स्विच, सीट बेल्ट आणि गियर शिफ्टर्ससाठी टोकाई रिका कंपनी लिमिटेड, लाइटिंगसाठी एएमएस कंपनी लिमिटेड, ब्लो-मोल्डेड घटकांसाठी क्योराकू कंपनी लिमिटेड, एअर बॅग, रबर होसेस आणि सीलिंगसाठी टोयोडा गोसेई कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे. इन्फोटेनमेंट सिस्टिमसाठी डेन्सो टेन लिमिटेड, पिंट्रेड सर्किट बोर्ड (पीसीबी) साठी कॅटोलेक कॉर्पोरेशन, स्पीकर्ससाठी ओंक्यो कॉर्पोरेशन आणि सेन्सरसाठी सेन्सटा टेक्नॉलॉजीज या कंपन्यांसोबत केलेल्या भागीदारीमुळे कंपनीला आपला उत्पादन पोर्टफोलिओ आणि ओईएमसह प्रति वाहन सामग्रीचा विस्तार करण्यात मदत झाली आहे. उत्पादनाची वाढती मागणी पाहता कंपनी आपली अलॉय व्हीलची उत्पादन क्षमता चौपटीने वाढवत आहे. दोन टप्प्यात होणारे हे विस्तारीकरण तसेच नवीन प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक तसेच गुणवत्तेमुळे देशांतर्गत कंपंनीच्या उत्पादनाना मागणी तसेच निर्यातीतदेखील वाढ अपेक्षित आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून प्रत्येक पडझडीत उनो मिंडाचा जरूर विचार करा.

उनो मिंडा लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२५३९)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  ५५७/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. ६३०/३५८

बाजार भांडवल :

रु. ३२,००० कोटी

भरणा झालेले भागभांडवल :. ११४.४३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६७.३४  

परदेशी गुंतवणूकदार      ९.०४

बँका/ म्यु. फंड/ सरकार   १४.०० 

इतर/ जनता     ९.६२

सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. 

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           :  लार्ज कॅप

* प्रवर्तक              :  एन के मिंडा समूह   

* व्यवसाय क्षेत्र        :  वाहनांचे सुटे भाग

* पुस्तकी मूल्य        :  रु. ६०.१

* दर्शनी मूल्य         :   रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश     : ७५%

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :  ८.४ रु.

*  पी/ई गुणोत्तर       :      ६०

*  समग्र पी/ई गुणोत्तर :       २४

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.२७

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    ११.१

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १३.८

*  बीटा :      ०.९  

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

stocksandwealth@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uno minda ltd company profile zws