छत्रपती संभाजीनगर : हिंसाचाराचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांच्या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तपास पथकाच्या कामकाजावर वरिष्ठ अधिकारी नियंत्रण ठेवणार असल्याचे पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी शुक्रवारी सांगितले. दंगलप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असून राम मंदिर परिसर, किराडपुरा भागात शीघ्र कृती दल, राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रक वाहने तैनात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्योग जगतात अस्वस्थता

धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयोगासाठी मराठवाडय़ाच्या भूमीचा सातत्याने वापर केला जात आहे. त्यामुळे विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या उद्योजकांनी निर्माण केलेल्या वातावरणावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत नेत्यांनी संयम दाखवावा अशी प्रतिक्रिया उद्योग जगतातून व्यक्त होत आहे. दरम्यान शहरात शांतता राहावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे हिंदूत्व हे विचारी असून त्याचा विकासासाठीच आम्ही उपयोग करू, असे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

दंगलखोरांचा कसून शोध

हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील शहरातील जनजीवन शुक्रवारी सुरळीत झाले. पोलिसांची गोळी लागून मृत झालेले ४५ वर्षांचे शेख मुनिरोद्दीन यांच्यावर पहाटे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंसाचार व जाळपोळ प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या सहा जणांमध्ये मृत मुनिरोद्दीन यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. वास्तविक मृत फैज कॉम्प्लेक्सच्या लोखंडी गेटच्या आतमध्ये उभे होते. तरी त्यांचे नाव आरोपीच्या यादीत कसे, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असल्याने आपल्याला अटक होईल या भीतीने किराडपुरा आणि भोवतालचे अनेक जण आपल्या घरांना टाळे लावून इतरत्र गेले आहेत. 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sit to investigate riots tense silence investigate violence ysh