या लेखात आपण ‘एथिक्स’च्या पेपरमधील केस स्टडी कशा सोडवायच्या याचा आढावा घेणार आहोत. २०१३च्या पेपरमधील विभाग ब हा पूर्णत: केस स्टडीजना वाहिलेला विभाग आहे. एकूण ६ प्रकरणे १२५ गुणांकरता विचारली गेली आहेत. या विभागात प्रत्येक प्रश्नासाठीचे निर्धारित गुण व त्याकरिता नियोजित शब्दसंख्या यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. पूर्वपरीक्षेमधील निर्णयक्षमता चाचणी व समस्या सोडवणूक याच घटकाचे एक विस्तारित व अधिक बारकाव्यांची नोंद घेणारे रूप असे या घटकाचे वर्णन करता येईल. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे विभाग ब मध्येदेखील यूपीएससीने पुरविलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेमधील काही प्रश्न जवळजवळ जसेच्या तसे विचारले गेले आहेत. तसेच २०११, २०१२ व २०१३ या वर्षी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेतील निर्णयक्षमता चाचणी या घटकातील प्रश्नांवर आधारित विषय पुन्हा हाताळले गेले आहेत. अर्थात अतिशय किरकोळ बदल वगळता प्रश्नामधून विचारली जाणारी नतिक संकल्पना सारखीच आहे.
साधारणत: २५० ते ३०० शब्दांत लिहायच्या या उत्तरामध्ये उमेदवारांनी लिखाणाची शिस्त ठेवणे अतिशय गरजेचे बनते. केसमध्ये दिलेल्या बारकाव्यांमधून उत्तर लिहिण्यासाठीचे मुद्दे वेगळे काढणे, केसच्या संदर्भात एकूण मोठय़ा नतिक तसेच सामाजिक प्रश्नांचा आढावा घेणे व याबरोबरच प्रश्नांचा रोख लक्षात घेऊन शब्दमर्यादेचे भान ठेवत उत्तर लिहिणे ही आव्हानात्मक बाब आहे. म्हणूनच या प्रश्नांची उत्तरे लिहीत असताना आपल्यासमोर असलेल्या आव्हानाचा टप्प्याटप्प्याने विचार करणे फायद्याचे ठरते. केस स्टडीचे उत्तर लिहीत असताना खालील टप्प्यांचा मार्गदर्शक म्हणून वापर करता येतो-
० नतिक प्रश्न ओळखणे – केस स्टडीचे उत्तर लिहिण्यामधील सगळ्यात निर्णायक टप्पा म्हणजे नक्की नतिक प्रश्न कोणता आहे, हे ओळखणे. दिलेल्या माहितीमधून नक्की कोणती नतिक द्विधा सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे ठरवावे लागते. तसेच जो निर्णय आपल्याला योग्य वाटतो तो निर्णय किंवा ती परिस्थिती एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गटाला अपायकारक ठरू शकेल का? हा निर्णय चांगल्या आणि वाईट पर्यायी निवडींचा विचार करून घेतला गेला आहे का? अनेक वेळा दोन ‘चांगल्या’ किंवा दोन ‘वाईट’ निर्णयांमधून निवड करावी लागते, याचे भान आपल्याला आहे का? निर्णय कायदेशीर आहे का, अधिक कार्यक्षम काय आहे? द्विधा असताना पुढीलप्रमाणे विचार करून पाहता येऊ शकतो- मी घेतलेल्या निर्णयाबद्दल असे काहीतरी आहे का, की जे मला अस्वस्थ करत आहे?’ किंवा ‘माझ्यात कोणता नतिक संघर्ष निर्माण होत आहे का?’
० वस्तुस्थिती जाणून घ्या- परिस्थितीशी संबंधित काय वस्तुस्थिती आहे? अजून कोणती तथ्ये/ वस्तुस्थिती माहीत नाही? दिलेल्या माहितीचा व आपल्याकडील ज्ञानाचा वापर करून बरेचसे ताíकक निष्कर्ष काढता येता येऊ शकतात. अपेक्षित निर्णय घेण्याकरिता लागणारी माहिती पुरेशी आहे का? (एखादा निर्णय घेण्यासाठी मला पुरेशी माहिती आहे का? परिणामांमध्ये संबंधित व्यक्तींची आणि गटांची महत्त्वाची भूमिका काय असेल? काही काळजी करण्यासारखे अधिक महत्त्वाचे आहे का? असेल तर का? अंमलबजावणी करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? संबंधित सर्व व्यक्तींशी आणि गटांशी विचारविनियम केला का? सर्जनशील/ निर्मितीक्षम पर्यायांना मी ओळखले आहे का? नतिक द्विधा ओळखल्यानंतर व वस्तुस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपलब्ध पर्यायांचा विचार केला पाहिजे.
० पर्यायी क्रियांचे मूल्यमापन करत असताना खालील दृष्टिकोनांचा वापर करता येऊ शकतो..
* कोणत्या पर्यायातून जास्तीतजास्त चांगला परिणाम मिळेल आणि कोणता कमीतकमी अपायकारक असेल? (The Utilitarian Approach/ उपयुक्ततावादी दृष्टिकोन)
* निर्णयातून ज्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे, त्या सर्वाच्या हक्कांचा मान राखला जाईल असा कोणता पर्याय आहे? (हक्कांधिष्ठित दृष्टिकोन/ Justice Approach)
* कोणता पर्याय लोकांना समानतेने किंवा न्यायाने वागणूक देऊ शकतो? (न्यायाधिष्ठित दृष्टिकोन/ Rights Approach)
* कोणता पर्याय फक्त समाजाच्या काही घटकाला नव्हे तर संपूर्णपणे समाजाला सर्वाधिक उपयोगी पडेल? (सामायिक कल्याणकारी दृष्टिकोन/ Common Good Approach)
* मला ज्या प्रकारची व्यक्ती बनायचे आहे त्याच्या काहीसा जवळ घेऊन जाणारा निर्णय कोणता असेल? (सद्गुणाधिष्ठित दृष्टिकोन/ The Virtue Approach)
या सर्व दृष्टिकोनांबद्दल पुढच्या लेखात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.
० पर्यायांची चाचणी- मात्र केस स्टडीचे उत्तर पूर्ण करण्यासाठी केवळ इतकेच पुरेसे नाही. तर या सर्व दृष्टिकोनांच्या वापराचा संदर्भ वेगवेगळ्या कसोटय़ांवर तपासून पाहायला हवा. आपण निश्चित केलेला निर्णय तपासण्याकरिता खाली दिलेल्या चाचण्या उपयोगी पडतात-
* अपाय चाचणी- इतर पर्यायी निवडीपेक्षा ही निवड कमी नुकसान/ अपाय करणारी आहे का?
* संरक्षणीय चाचणी- नियामक मंडळाच्या चौकशीपुढे किंवा विभागीय समितीपुढे मी घेतलेल्या/ निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करू शकेन का?
* सहकारी चाचणी- माझी अडचण आणि त्यावर सुचविलेला उपाय हे जेव्हा माझ्या सहकाऱ्यांना वर्णन करून सांगेन, तेव्हा याबाबत त्यांचं म्हणणं काय असेल? मी घेतलेल्या निर्णयाची इतरांकडून अंमलबजावणी करून घेतली जाऊ शकते का?
* व्यावसायिक चाचणी- माझ्या व्यवसायातील नियामक मंडळ किंवा नतिक समिती यांचे मी निवडलेल्या पर्यायाविषयी काय म्हणणे असेल?
* संघटना चाचणी- या निर्णयाविषयी विभागाच्या नीतिशास्त्राचे अधिकारी/ किंवा कायदेविषयक उपदेशक यांचे म्हणणे काय असेल?
० परिणामकारक कृती- मी घेतलेल्या निर्णयाची जास्तीतजास्त काळजीपूर्वक अंमलबजावणी कशी होईल, हे तपासणेदेखील गरजेचे आहे. तसेच या परिस्थितीतून मला मिळालेल्या निष्कर्षांचा उपयोग इतर सारख्याच परिस्थितीचे प्रश्न सोडवण्यासाठी कसा करून घेता येईल हेदेखील पाहणे गरजेचे आहे. तसेच अशा प्रकारे नतिक द्विधा पुन्हा उद्भवू नये म्हणून कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याचादेखील विचार केस स्टडीच्या उत्तरातून मांडला पाहिजे. तसेच प्रस्तुत परिस्थिती टाळण्याकरिता कोणते धोरणात्मक बदल आवश्यक आहेत का, याचा आढावादेखील घेतला जाऊ शकतो. (भाग पहिला)
admin@theuniqueacademy.com
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2014 रोजी प्रकाशित
केस स्टडी प्रतिसाद लेखनातील टप्पे
यालेखात आपण ‘एथिक्स’च्या पेपरमधील केस स्टडी कशा सोडवायच्या याचा आढावा घेणार आहोत. २०१३च्या पेपरमधील विभाग ब हा पूर्णत: केस स्टडीजना वाहिलेला विभाग आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-10-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case study steps in response writing