Success Story:व्यवसायात जर का यश मिळवायचं असेल तर जोखीम ही घ्यावीच लागणारच. पण, जोखीम पत्करण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते. कारण जे जोखीम पत्करतात तेच एकेदिवशी जाऊन इतिहास घडवतात. संजीव बिखचंदानी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. Naukri.com आणि Jeevansathi.com सारख्या लोकप्रिय वेबसाइटच्या मागे असलेल्या इन्फो एज (Info Edge) कंपनीचे ते मालक आहेत. आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी मित्र आणि नातेवाईकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष केलं, चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि आज त्यांनी ५०,००० कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे.

संजीव बिखचंदानी यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून पदवी घेतली आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं. यादरम्यान आयआयएम अहमदाबादमध्ये ते सुरभी यांना भेटले. काही दिवसांनी त्यांचे लग्न झाले. संजीव बिखचंदानी यांच्या प्रवासात त्यांच्या पत्नीने प्रचंड पाठिंबा दिला.आयआयएममधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८९ मध्ये ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या नामांकित कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. पण, अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच १९९० मध्ये संजीव यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांची पत्नी सुरभी यांच्या पगारामुळे घरखर्च भागवता आला तर संजीव यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळाले.

हेही वाचा…Success Story: जिद्दीला सलाम! बाबांनी कपडे शिवून सांभाळला खर्चाचा भार; अनेक संकटांवर केली ‘त्याने’ मात; पाहा फ्लाइंग ऑफिसरचा प्रेरणादायी प्रवास

पण, पत्नी घरखर्च करते म्हणून अनेकदा नातेवाइक आणि मित्रांनी त्यांना बरेच टोमणे मारले. पण, त्यांनी याकडे दुर्लक्ष करत स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत राहिले आणि मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभा केला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे उदाहरण आज या सक्सेस स्टोरीतून पुन्हा एकदा स्पष्ट होते आहे. संजीव बिखचंदानी यांनी १९९० मध्ये वडिलांच्या गॅरेजमधून सेकंड हँड कॉम्प्युटर आणि जुने फर्निचर वापरून इन्फो एज इंडियाची सुरुवात केली आणि आज त्यांची कंपनी लोकांना त्यांच्या आयुष्यातील जोडीदार व नोकरी शोधण्यात मदत करण्यात हातभार लावत आहेत.

१९९० मध्ये सुरु केलेल्या कंपनीला सात वर्षांनी फळ मिळालं. सुरवातीला त्यांनी नोकरी डॉट कॉम हे पोर्टल सुरु केलं. त्यानंतर Jeevansathi.com आणि मग shiksha.com, 99acres.com यांची सुरुवात केली. या कंपन्यांनी त्यांना नावाबरोबर ओळख सुद्धा मिळवून दिली. फोर्ब्सनुसार, संजीव बिखचंदानी यांची एकूण संपत्ती १९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याची कथा यशाच्या शोधात जोखीम पत्करण्याची तयारी दर्शवणारी आहे ; जी अनेकांसाठी प्रेरणा ठरणारी आहे.