दत्तात्रय पाडेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘चित्रांचं वेड लहानपणापासूनचं, पण विशी ते पंचविशीच्या काळात खूप मोठे शिक्षक भेटले, काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष. त्यांच्याकडून जे मिळालं त्यातून आणि ‘जे.जे’मध्ये शिकत असताना तेथील चित्रं न्याहाळण्यातून, चित्रवाचनातून चित्रं उलगडत गेली. नोकरी मिळाली तीही आवडत्या ठिकाणी, ‘इलस्ट्रेटर’ म्हणून. त्या कृष्णधवल रेषांमध्ये नावीन्य, विविधता, सौंदर्य, गोडवा आणि कलात्मकता आणण्याचा प्रयत्न करत गेलो. पुढे तर अभिजात चित्रकलेमध्ये रमून गेलो. प्रदर्शनं भरवली. निसर्गाच्या छायेत, रंग-रेषांच्या दुनियेत आजही रमलोय ते गद्धेपंचविशी’त आलेल्या चित्रभानाचंच देणं आहे.’’

विशी ते पंचविशी हा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा कालखंड.  माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी याच कालखंडात घडल्या. किंबहुना माझ्या बाबतीत घडत गेल्या. नकळत मी निर्णय घेत गेलो आणि सर्व बाबतीत मी नशीबवान ठरलो. ठरवून मी काहीच कधी केलं नाही. सारं काही घडत गेलं.. मला घडवत गेलं..

१९७२ मध्ये म्हणजे वयाच्या बाविसाव्या वर्षी मी ‘सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट’मधून ‘कमर्शियल आर्ट’चा डिप्लोमा प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालो आणि तिथेच ‘असिस्टंट लेक्चरर’ म्हणून माझी नेमणूक झाली. शिकवण्याची आवड होती. कॉलेजमध्ये मी रमून गेलो. मला माझ्या आवडीचं काम- चित्रं काढायला मिळत होती. कॉलेजमध्ये शिकवत असताना माझे गुरू प्रा. वसंत सवाई यांनी माझी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये ओळख करून दिली आणि मी अध्यापनाचं काम करत असतानाच ‘टाइम्स ऑफ इंडिया’चं ‘फ्रीलान्स’ काम- ‘इलस्ट्रेशन’ करू लागलो. तिथे काम करायची माझी खूप इच्छा होती. तिथल्या कला विभागात उत्तमोत्तम इलस्ट्रेटर्सची एक परंपरा होती. माझी इच्छा पूर्ण झाली; पण मी कोणालाही न सांगता, न विचारता पाच वर्षांतच महाविद्यालयातली सुरक्षित नोकरी सोडली. याच दरम्यान मी माझ्या कॉलेजमधल्या वर्गमैत्रिणीशी, मंगलशी (नाईक) १९७७ मध्ये साधेपणानं विवाह केला. अंधेरीला स्वत:चं घर घेतलं आणि तिथे राहायला गेलो.  इलस्ट्रेटर म्हणून काम सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थानं माझी चित्रकार म्हणून ओळख व्हायला सुरुवात झाली..

येथपर्यंत मी कसा घडलो हे पाहताना लक्षात आलं, की मला घडवण्यामध्ये माझ्या सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे; अगदी प्राथमिक शाळेतील शिक्षकांपासून. लहानपणापासूनच मला चित्रकलेचं प्रचंड वेड होतं. प्राथमिक मराठी शाळेतले माझे गुरुजी दामोदर कृष्णाजी जोशी यांनी त्या वयात बोरूनं वळणदार, सुंदर अक्षरं काढायला शिकवलं होतं. पुढे गुजराती शाळेतले माझे चित्रशिक्षक भिखुभाई पटेल यांनी माझा चित्रकलेचा पाया मजबूत करून घेतला. त्यांचे चित्रकलेचे सर्व विषय उत्तम होते. ते चित्रकार रविशंकर रावळ यांचे शिष्य. शालेय पातळीवरच त्यांनी मला स्केचिंगचे धडे दिले होते. अमृता शेरगिल, नंदलाल बोस यांच्यासारख्या अनेक थोर चित्रकारांच्या चित्रांद्वारे त्यांच्या चित्रशैलींची ओळख करून दिली होती. ते त्यांचं व्यक्तिगत रंगसाहित्य मला वापरायला देत असत. मला वाटतं, माझ्यात दडलेला चित्रकार त्यांना दिसला असावा. मी दहावीत असताना मला गुजरात राज्य ‘ललित कला अकादमी’चं पारितोषिक मिळालं, तसंच ‘एस.एस.सी.’ला चित्रकला विषयात गुजरात राज्यात मी पहिला आलो. पुढे चित्रकलेमध्ये उच्च कला शिक्षण असतं हे मला माहीत नव्हतं. ‘एस.एस.सी.’नंतर भिखुभाईंनी मला ‘डी.टी.सी.’ (ड्रॉइंग टीचर सर्टिफिकेट) हा एक वर्षांचा अभ्यास करण्याचा आणि नंतर ‘जे.जे.’मध्ये शिकण्याचा सल्ला दिला.

अमलसाड (गुजरात) येथील कला विद्यालयात मी ‘डी.टी.सी.’मध्ये प्रवेश घेतला. तिथे चित्रकलेच्या सर्व विषयांत निष्णात असलेले सर्वगुणसंपन्न जशुभाई नायक मला गुरूम्हणून लाभले. त्यांनाही माझ्यातील चित्रकार जाणवला असावा. आमचं गुरू-शिष्याचं नातं जडलं. ‘डी.टी.सी.’बरोबरच पेंटिंगचे धडे त्यांनी दिले आणि माझं पेंटिंगही सुरू झालं. जशुभाई हे ‘जे.जे.’तील धोंड सरांचे विद्यार्थी होते. त्यामुळे जलरंगांवर त्यांचं प्रभुत्व होतं. तैलरंगात ते ‘बोल्ड वर्क’ करायचे. त्यांच्या कामात ‘जे.जे.’च्या पोर्ट्रेटचा प्रभाव जाणवायचा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्यांची विचारधारा होती. त्यांच्याकडून आयुष्यासाठीची भरपूर शिदोरी मला मिळाली. त्यांनी मला पुढे ‘जे.जे.’मध्ये जाऊन शिकण्याचा सल्ला दिला. मी सामान्य, अशिक्षित शेतकरी कुटुंबात वाढलो होतो. आर्थिक पाठबळ काहीही नव्हतं. चित्रकला म्हणजे काय, हे घरी कोणालाही माहीत नव्हतं आणि चित्रकला हे माझं वेड होतं. शेवटी माझे आतेभाऊ शिवाजी लेंडे यांच्या मदतीनं मी मुंबईला आलो.

मला ‘जे.जे.’मध्ये प्रवेश घ्यायचा होता. माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक- ‘फाइन आर्ट’ आणि दुसरा- ‘कमर्शियल आर्ट’. कमर्शियल आर्ट मला माहीत नसल्यामुळे इथं कलेतलं नवीन काही तरी शिकायला मिळेल, या उत्सुकतेपोटी मी ‘सर जे.जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट’मध्ये प्रवेश घेतला. चित्रकलेचा कोणताही विषय असो, त्यात प्रावीण्य मिळवायचंच, हा माझा ध्यास होता. इथं मला अनेक शिक्षकांबरोबरच प्रा. वसंत सवाई हे गुरू म्हणून लाभले. इलस्ट्रेशन मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्या चित्रांना एक ‘ग्राफिक टच’ होता. इलस्ट्रेशन हा माझा आवडता विषय होता, कारण त्यात मला कलात्मकता जाणवायची. इथं हा विषय शिकवण्यासाठी व्ही. एस. गुर्जर, मनोहर जोशी आणि रवी परांजपे ही मंडळी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून येत होती. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकता आल्या आणि त्या सर्वाचा मी आवडता विद्यार्थी झालो. खरं म्हणजे मला या सर्व शिक्षकांनी घडवलं. मुळात मला लाभलेल्या सर्व शिक्षकांचं काम अप्रतिम होतं. हा माझा शिकण्याचा काळ होता.

१९७२ मध्ये ‘सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट’मध्ये शिकवत असतानाच मी ‘हॉबी क्लास’मध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून मी ‘जे.जे.’च्या भिंतींवरील सर्व चित्रं न्याहाळीत असे, चित्रवाचन करीत असे. ए एक्स त्रिंदाद,  ए. ए. भोंसुले, शंकर पळशीकर, लँगहॅमर,

बाबूराव सडवेलकर, गोपाळ देऊसकर, गोपाळ पद्मशाली, एम. आर.आचरेकर, व्ही.एस. गुर्जर, गजानन हळदणकर- आदी अनेक चित्रकारांच्या चित्रांतून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. फ्रॅडरिक जॉर्ज स्वाईश या चित्रकाराची पेन्सिल शेडिंगमध्ये केलेली अप्रतिम चित्रे मी नेहमी न्याहाळत असे. त्या वेळी ही सर्व चित्रं ‘जे.जे.’च्या भिंतींवर होती.

   सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला लागलेली चित्रवाचनाची गोडी. ती मला शालेय जीवनापासूनच लागली. पाठय़पुस्तकातली चित्रं बघण्यामध्ये मी रमून जात असे. ती सर्व चित्रं दीनानाथ दलाल यांची होती हे मला कॉलेजला गेल्यानंतर कळलं. शाळेत असताना चित्रकलेला वाहिलेलं ‘कुमार’ हे गुजराती मासिक यायचं. ते मी नेहमी वाचत असे. एन. एस. बेंद्रे, माधव सातवळेकर,  शंकर पळशीकर, नंदलाल बोस, रसिकलाल परीख, सोमालाल शाह, वासुदेव स्मार्त- आदी चित्रकारांची ओळख त्यांच्या चित्रांतून झाली. त्या वेळेस कॉम्प्युटर किंवा इंटरनेट हे तंत्रज्ञान नसल्यामुळे चित्रांचा अभ्यास फक्त चित्रमय पुस्तकांतूनच करता येत होता.

‘जे.जे.’चं ग्रंथालय दृश्यकलेच्या पुस्तकांनी समृद्ध होतं. त्यातील पुस्तकांमुळे अमेरिकी इलस्ट्रेटर्सचं वेगळं विश्व माहीत झालं. नॉर्मन रॉकवेल, एन. सी. वाईथ, अल पार्कर, बॉब पेक, मार्क इंग्लिश, रॉबर्ट हॅन्डल, बर्नी फूक्स यांच्यासारख्या अनेक थोर ‘इलस्ट्रेटर-पेन्टर्स’चा अभ्यास करता आला. अमेरिकी इलस्ट्रेटर्स एक प्रेरणास्रोत झाला. पुढे इलस्ट्रेशन करताना मी सर्व प्रकारचे प्रयोग केले. रंगीत चित्रांसाठी विविध माध्यमांचा वापर केला. त्या वेळच्या वर्तमानपत्रासाठी केवळ कृष्णधवल चित्रं करावी लागत. त्यासाठी अनेक प्रकारच्या रेषांचा वापर केला. त्यातही विविध प्रकारचे स्क्रीन, फोटोग्रामचाही वापर केला. ही बोधचित्रं केवळ बोधचित्राच्या पातळीवर न राहता अभिजात चित्रं म्हणूनही त्या चित्रांचा आस्वाद घेता यावा, असा माझा प्रयत्न असायचा. बोधचित्रं ही मुख्यत्वे रेषाप्रधान चित्रं. केवळ कृष्णधवल रेषांमध्ये नावीन्य, विविधता, सौंदर्य, गोडवा आणि कलात्मकता चित्रांमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असायचा.

ही कामं करत असताना माझा अभिजात चित्रकलेचाही प्रवास सुरूच होता. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’ अशा अनेक प्रदर्शनांत, स्पर्धेमध्ये नेहमी नवनवीन चित्रं पाठवत असे, भाग घेत असे. अनेकदा पारितोषिक मिळत असे. यथावकाश मी अभिजात चित्रकलेमध्येच रमून गेलो.

मला आवडणाऱ्या अभिजात चित्रांचा अभ्यास आणि चित्रं माझ्या दृष्टीनं तपासून पाहण्याची सवय लागली. चित्रकलेच्या संदर्भात न पटणाऱ्या गोष्टींचा स्वीकार न करता डोळसपणे पाहायला शिकलो, स्वतंत्रपणे विचार करू लागलो आणि माझी चित्रकलेविषयी वेगळी विचारधारा तयार झाली.

गुळगुळीत, ‘स्प्रे फिनिश’ किंवा ‘फोटो फिनिश’ अशी चित्रं मला लहानपणापासून कधी आवडली नाही. तसंच अबोध, अनाकलनीय, अगम्य, अर्तक्य अशी चित्रंही भावली नाहीत. अशा चित्रांवर केलेलं भाष्य म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे. मुळात चित्र ही जगातली सगळ्यात सोपी भाषा. ती दुबरेध करण्यातला आनंद मला समजला नाही, असो.

चित्रांत नावीन्य, लालित्य, सौंदर्य, कलात्मकता, चित्र पुन्हा पहायला लावणारं, खिळवून ठेवणारं, आव्हानात्मक असं काही असायला हवं, अशी माझी धारणा झाली. कारागिरी किंवा कौशल्य आणि कलात्मकता या फार वेगळ्या गोष्टी आहेत. कलात्मकतेत व्यापक अर्थ दडलेला आहे. ती चित्रामध्ये स्पष्ट जाणवते. त्याप्रमाणे वेगळे प्रयोग करत चित्रात सौंदर्य, कलात्मकता आणण्याचा प्रयत्न करत राहिलो. नवनवीन गोष्टी शिकण्याची ऊर्मी सतत राहिली. मुळातच अभिजात चित्रकलेचा पिंड असल्यामुळे चित्रं करीत राहिलो. अनेक स्वतंत्र चित्रप्रदर्शनं केली.

माझं पहिलं प्रदर्शन निसर्गचित्रांचं- पोस्टर कलर या माध्यमामध्ये केलेलं होतं. चित्रकार शंकर पळशीकर यांच्या हस्ते त्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं. पुढे अनेक प्रदर्शनं मुंबईत ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त झाली. प्रत्येक वेळेला चित्रांचे विषय वेगळे निवडत असे. तरीही मी अनुभवलेलं खेडय़ातलं जनजीवन, निसर्ग याच्याशी ते विषय निगडित होते. ‘स्लीपिंग ब्युटी’, ‘बहर’, ‘मंथन’, ‘आठवडय़ाचा बाजार’, ‘द्वंद्व’, ‘बहरलेली पायवाट’, ‘भारवाही’, ‘प्रतिबिंब’, ‘गाणं वाळवंटाचं’ ही माझी झालेली प्रदर्शनं. प्रत्येक प्रदर्शनाचे विषय वेगळे, मांडणी वेगळी, वेगळं माध्यम, वेगळं रंगलेपन. प्रत्येक वेळेला नवीन काही तरी शोधण्याचा माझा प्रयत्न असायचा. त्यामुळे माझी मलाच उत्सुकता असायची, की या वेळेला प्रदर्शनात नवीन काय. प्रत्येक वेळेला चित्रनिर्मितीचा अनुभव आनंददायी असायचा. एक प्रदर्शन लंडनला केलं होतं. त्या निमित्तानं सुमारे दोन महिने लंडनला राहिलो. तिथली सर्व म्युझियम्स अनेकदा पाहणं झालं. जगप्रसिद्ध थोर चित्रकारांची मूळ चित्रं पाहणं हा एक वेगळाच आनंदानुभव; कलेची क्षितिजं विस्तारणारा. फ्लॉरेन्स आणि पॅरिसलाही जाण्याची संधी मिळाली. तिथली सर्व म्युझियम्स पुन:पुन्हा पाहिली. कलेची मुख्य देवालयं पाहून झाली. ते सर्व दिवस मला मंतरलेले वाटत होते. एक वेगळी ऊर्जा प्राप्त झाल्याचा अनुभव मिळाला. आपण अजून खूप काही करू शकतो, हा आत्मविश्वास दुणावला. आई-वडिलांकडून मला स्वातंत्र्याची दीक्षा मिळाली. आईकडून सतत कार्यरत राहणं आणि मनाची निर्मळता, वडिलांकडून सतत अग्रेसर राहणं हा अमोल वारसा मला मिळाला आणि गुरुजनांचं मोलाचं मार्गदर्शन. या शिदोरीवर ही वाटचाल सुकर करू शकलो.

बालपणी ज्या निसर्गात रमलो, त्याच निसर्गाच्या सान्निध्यात टुमदार स्टुडिओ झाला. आजूबाजूला कलेला पोषक वातावरण आणि याच मातीत अनुभवलेले अगणित विषय. आता यापुढे आणखी काय निर्मिती होते याची उत्सुकता मलाही आहेच!

dattapadekar@hotmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaddhepanchvishi author dattatraya padekar year turns colors ysh