मकरंद जोशी
जिवाभावाची निखळ मैत्रीणच पुरुषातल्या मित्राला आकार देऊ शकते. पुढे त्याचं वेगळ्या मुलीशी लग्न झाल्यावर ‘नवरा’ या भूमिकेत शिरल्यावरही त्याच्यातलं मित्रत्व कायम टिकलं, तर त्याचं श्रेय पुष्कळदा त्याच्या निखळ मैत्रिणीचंच! आपापले संसार उत्तम चाललेले असताना एखादं नवं पुस्तक वाचलं, नवं नाटक वा सिनेमा पाहिला, ‘अरे, आता ‘ती’ इथे असायला हवी होती,’ अशी ओढ वाटणं, हा दूर राहूनही घट्ट राहिलेल्या मैत्रीचा बंध. इतर जवळच्या नात्यांच्या भोवती आखलेलं हे जिवाभावाच्या नात्याचं रिंगण!

प्रिय मंजिरी,

खरं म्हणजे हे असं पत्र मी तुला कधी लिहीन असं मलाही वाटलं नव्हतं. कारण आपल्या मैत्रीमध्ये अनेक गोष्टी आपण (म्हणजे अनेकदा मीच!) उघडपणे बोलून दाखवत नाही. शिवाय आपलं नातं इतकं अनौपचारिक आहे, की ‘प्रिय’, ‘डियर’, असं काहीही न म्हणता आपण तेच म्हणत असतो. याला कारण मुळात आपली ही जी ‘जिवाभावाची’ मैत्री आहे ती इतकी नकळत, सहज झाली, की त्यामुळे तिची वीणही तशीच झाली.

हेही वाचा : सांदीत सापडलेले : सुट्टी!

मला वाटतं, आपण शाळेच्या नाटकात काम केलं तेव्हा- म्हणजे इयत्ता सातवीत असताना आपली मैत्री झाली. तसंही मला मुलींशी बोलायला अजिबातच संकोच वाटायचा नाही किंवा मुलांप्रमाणेच मुलींशीही मी सहज गप्पा मारायचो. आपण तिसरीत असताना ‘तुम्ही सगळे फार बडबड करता,’ असं म्हणून बाईंनी वर्गात एक मुलगा-एक मुलगी असं बसवलं होतं आणि माझ्या शेजारी बसलेल्या मुलीशी त्या दिवशी शाळासुटेपर्यंत खोडरबर उसनं देण्याइतकी मैत्री झाली होती! त्यात शाळेच्या स्पर्धा-नाटकं, यांमुळेही मी तसाही मुलींशी बोलायला कम्फर्टेबल असायचो. (काहीजणींशी बोलताना तरी अवघडल्यासारखं व्हायचं… पण ते असोच!) त्यामुळे तुझ्याशी मैत्री अगदी सहज झाली. त्यात आपली वाचनाची आवड, नाटक-सिनेमा बघणं (म्हणजे आपापलं, स्वतंत्रपणे. आपण एकत्र पाहिलेला सिनेमा/नाटक आठवावंच लागेल!) आणि दोघांच्या घरातलं मोकळं वातावरण याचा वाटा अर्थातच मोठा होता. त्यामुळेच शाळेतल्या, वर्गातल्या अनेक मुलींशी मी गप्पा मारत असलो, तरी ‘मैत्री’ जुळली ती तुझ्याशीच. दहावीनंतर आपले मार्ग भिन्न झाले. म्हणजे मला बाबांच्या ‘आग्रहा’मुळे कॉमर्सला जावं लागलं आणि मार्क कमी असल्यानं ‘ज्ञानसाधना’लाच अॅडमिशन मिळू शकली. तू ‘ठाणा कॉलेज आर्टस्’ला गेलीस. तिकडच्या वक्तृत्व, नाटक या ‘सर्कल’मध्ये तुला खास जागाही मिळाली. पण कॉलेजं वेगवेगळी आहेत म्हणून आपल्यात अंतर पडलं नाही. आपल्याला बोलायला वर्तमानपत्रातल्या लेखांपासून ते ‘सु.शिं.’च्या कादंबऱ्यांपर्यंत अनेक विषय असायचे. आपण एकमेकांचे घट्ट मित्र होतो, तशीच आपापली स्वतंत्र मित्रमैत्रिणींची वर्तुळंही होती. एकमेकांच्या मित्रमैत्रिणींवरून एकमेकांची टिंगल करायलाही आपण कमी नाही करायचो.
आज आपल्या त्या सगळ्या मैत्रीच्या वाटचालीकडे बघताना मला जाणवतंय, की अनेकदा मी माझ्या मित्रांबरोबरही ज्या विषयांवर बोलायला कम्फर्टेबल नसायचो, त्यावर तुझ्याशी बिनधास्त बोलायचो. म्हणजे तू मुलगी आहेस आणि तुझ्याशी अमुक एका विषयावर कसं बोलायचं? असा प्रश्न मला कधी पडला नाही. मुळात तेव्हा- म्हणजे ८०-९० च्या दशकात इंटरनेट, सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे एकूणच आपल्या अनुभवांना मर्यादा होत्या. त्यात तुझ्यासारख्या चारीठाव वाचणाऱ्या, नाटक-सिनेमा आवडीनं बघणाऱ्या आणि त्याबाबत बोलणाऱ्या मुली काय, मुलांचीही तशी चणचणच होती. म्हणूनच तुझ्यासारख्या उत्तम वाचक आणि संवेदनशील माणूस असलेल्या मुलीशी गप्पा मारणं, वाद घालणं, आवडलेल्या गोष्टी शेअर करणं, न आवडलेल्या गोष्टींबद्दल चडफडणं, हे सगळं करायला मला मज्जा यायची (तुला यायची का नाही, हे मी कधीच विचारलं नाही!). मग वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस नाही मिळालं, म्हणून आलेला वैताग काढायलाही तूच आणि घरात बाबांशी वाद झाल्यावर माझ्या गरम झालेल्या डोक्यावर पाणी ओतायलाही तूच, अशी माझी गत होती. पण एकूणच माझ्या बाकीच्या मैत्रिणींपेक्षा तू वेगळी आहेस हे मला कायम जाणवायचं. ‘स्त्री’ मासिकातलं विद्या बाळ यांचं संपादकीय वाचून त्यावर चर्चा करणं असो, किंवा गौरी देशपांडेंच्या नायिकांची यथार्थता पटवून देणं असो, अशा विषयांवर बोलू शकणारी, ठामपणे मतं मांडणारी माझ्या परिघात तरी तूच एकमेव होतीस. तुझ्या या संगतीचे अनेक आणि कायमस्वरूपी परिणाम माझ्यावर झाले, जे मला तेव्हा कळले नाहीत, पण पुढे- म्हणजे लग्न झाल्यावर, एका मुलीचा बाप झाल्यावर, वय वाढत जाताना नक्कीच जाणवले.

हेही वाचा : ‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!

तुझी आणि माझी मैत्री इतकी घट्ट होती, की मला जाम आवडलेल्या मुलीबद्दल मी फक्त तुलाच सांगितलं होतं. (त्याला ‘क्रश’ म्हणतात हे नंतर कळलं आणि ‘क्रश’चा रस फार टिकत नाही हेपण नंतर अनुभवलं!) आणि तू थंडपणे माझी (एकतर्फी) ‘प्रेमकथा’ ऐकून इतकंच म्हणाली होतीस, की ‘‘आधी ग्रॅज्युएट तर हो, नोकरीधंद्याचं बघ आणि मग काय प्रपोज करायचं ते कर.’’ ग्रॅज्युएट होईपर्यंत माझ्या त्या पहिल्या प्रेमाचा बहर सुकूनच गेला, पण तुझ्या त्या सूचनेमुळेच मी पुढचं पाऊल उचललं नाही आणि ‘ऑफिशियल प्रेमभंग’ होण्यापासून बचावलो! त्यानंतर दोन-एक वर्षांत तू अचानक लग्न ठरवलंस. म्हणजे तुझ्या मित्रवर्तुळातल्या एकानं तुला प्रपोज केलं आणि तू त्याला ‘हो’ म्हणालीस. हे सगळं इतकं अचानक- माझ्यासाठी तरी- झालं, की सर्वांत आधी तुझ्या नवऱ्याबद्दल मनात खूप राग दाटून आला… की हा कोण टिकोजीराव माझ्या मैत्रिणीला माझ्यापासून दूर नेणारा म्हणून. पुढे अनेक वर्षांनी हा राग थोडा (फार नाही, थोडाच हं!) कमी झाला, कारण त्याच्या बायकोमधली माझी मैत्रीण त्यानं कायम ठेवली होती! लग्नानंतर ३६० अंशात बदलेल्या माझ्या दुसऱ्या एका जुन्या मैत्रिणीचा अनुभव आल्यावर तर मला तुझ्या नवऱ्याविषयी आदरच वाटला. असो! तर तेव्हा तुझ्या अचानक लग्न करण्याच्या निर्णयाविषयी मला इतकं म्हणजे इतकं आश्चर्य वाटलं, की ते व्यक्त करायचंही विसरलो.

लग्नानंतर तुझ्या नवऱ्याबरोबर तू देशच सोडलास आणि मग मला जाणवलं, मी काय गमावलंय ते. तू माझी सगळ्यांत जवळची मैत्रीण आहेस, यावरच मी समाधानी होतो. पण तरीही, तू लग्न केल्यामुळे माझा तुझ्यावरचा अधिकार आणखी मर्यादित झाला आणि तुझं एक वेगळं वर्तुळ निर्माण झालं, हे पचवायला जरा जडच गेलं. त्यातल्या त्यात तू परदेशातच गेल्यामुळे तू रोज भेटू शकत नाहीस किंवा मनात आलं की तुझ्याकडे जाऊन भडाभडा बोलता येत नाही याचं दु:ख जरा कमी झालं. अर्थात जर तू तेव्हा भारतात- ठाण्यात राहिली असतीस, तर कदाचित अगदी रोज नाही, पण आठवड्यातून एक-दोनदा तरी तुला नक्की भेटलोच असतो. तू परदेशी गेल्यावर काही वेळा आपण एकमेकांना पत्र लिहून आपला जुनाच संवाद सुरू ठेवला होता. मग बहुधा माझ्याच आळशीपणानं त्यात खंड पडला.

हेही वाचा : स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

नंतर तू पुन्हा भारतात आलीस, काही वर्षं तुम्ही भारतात राहिलात आणि परत परदेशी गेलात, ते मात्र कायमचे. या सगळ्यात मी ‘ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय सुरू केला होता. नवा व्यवसाय आणि त्यातली नवी आव्हानं, यात मी बऱ्यापैकी गुरफटलो होतो. त्यातच माझंही लग्न झालं. या सगळ्यात आपला पत्रसंवाद थांबला, तरी आपलं नातं सुकलं नाही. आणि त्याचं श्रेय तुलाच जातं. दरवर्षी तू न चुकता माझ्या वाढदिवसाला केलेला फोन असो किंवा अधेमध्येही सहज म्हणून येणारा तुझा फोन हा आपल्यातला दुवा होता… खरंतर आपल्यातला दुवा त्याहीपेक्षा खूप खोल रुजलेला होता. म्हणून तर एखादं पुस्तक वाचल्यावर किंवा एखादं सणसणीत नाटक बघितल्यावर ‘अरे यार, आता तू इथे हवी होतीस. या पुस्तकाबद्दल/ नाटकाबद्दल तुझ्याशी बोलायला मजा आली असती,’ असं हमखास मला जे वाटून जायचं, ते आणि तसंच तुलाही वाटायचं. म्हणून तर परदेशातून पहिल्यांदा भारतात परत आली होतीस तेव्हा मला गिफ्ट काय आणलं होतंस, तर जगजीत सिंगच्या गझल्सची कॅसेट!

आपल्या आवडीनिवडीचे धागे हे असे एकमेकांमध्ये सहज गुंतलेले होते. आपली मैत्री याच धाग्यांनी विणलेली होती. त्यामुळेच तुझा नवरा किंवा माझी बायको, यांनाही आपल्या मैत्रीबद्दल कधी वावगं वाटलं नाही. किंबहुना आपले जोडीदार, आपलं कुटुंब आणि त्यांच्याबरोबरचं आपलं स्वतंत्र असं जे वर्तुळ होतं, त्याच्या बाहेर म्हटलं तर त्याला स्पर्श करणारं, म्हटलं तर सुट्टं असं आपल्या मैत्रीचं रिंगण आहे. मी आयुष्यात स्वत:ला नेहमी भाग्यवान समजतो, कारण माझ्या बायकोनं- मीतानं माझे अनेक हट्ट- म्हणजे नोकरी न करणं, चांगले पैसे देणारं एखादं काम केवळ मन फिरलं म्हणून सोडणं, असे कायम पुरवले आहेत. आणि ते केवळ एकाच निकषावर, की ‘मी तिला नवरा कमी आणि मित्र जास्त वाटतो’. नवरा झाल्यानंतरही माझ्यातला हा मित्र कायम राहण्याचं श्रेय मात्र तुलाच जातं. आपल्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळात तू माझ्यातल्या मित्राला, पुरुषाला जो आकार दिलास, त्यामुळेच पुढे मी अनेक मैत्रिणींशी चांगला मित्र म्हणून वागू शकलो.

हेही वाचा : शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!

तुला आठवतंय का, तेव्हा- म्हणजे १९८९ मध्ये सुपरहिट झालेल्या ‘मैंने प्यार किया’मधला गाजलेला डायलॉग होता- ‘‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही होते.’’ तेव्हाही ते ऐकताना थेटरात मला मोठ्ठ्यांदा हसावंसं वाटलं होतं, कारण मी तर तेव्हा एका गोड (थोड्या खारट!) मुलीबरोबर आठ-नऊ वर्षांची गाभुळलेली मैत्री अनुभवत होतो. आज हे सगळं या निमित्तानं लिहिलं गेलं आणि पन्नाशी ओलांडल्यावर आयुष्याचा जमाखर्च मांडताना पुन्हा एकदा जमेच्या बाजूला तुझ्यासारखी जिवाभावाची मैत्रीण आहे याचा आनंद झाला, तसाच आधार आणि अभिमान वाटला!
makarandvj@gmail.com

पुरुष वाचकहो, तुम्ही मांडायचे आहेत तुमचे अनुभव! आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंसं वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंसं वाटलंय? अर्थात भिन्नलिंगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? आम्हाला सांगा. महत्त्वाचं, या सदरात फक्त पुरुषांनीच आणि तेही आपल्या मैत्रिणीविषयी, त्यांच्यातल्या नात्याविषयी मनमोकळेपणानं लिहिणं अपेक्षित आहे. आम्हाला पाठवा ते अनुभव तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह ५०० किंवा १००० शब्दांत. आमच्या ईमेलवर chaturang.loksatta@gmail.com