गुडगावमध्ये घरकाम करणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीवर तिच्या घरमालकांनी शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी मूळची बिहार येथील रहिवासी असून मागील सहा महिन्यांपासून ती घरकाम करत होती. पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर शुक्रवारी तिची सुटका करण्यात आली.
तिग्रा येथे राहणारी पीडितेची आई गेल्या चार महिन्यांपासून आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र घरमालक तिला भेटू देत नव्हते. अखेर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यासह आयपीसीच्या इतर कलमांतर्गत सेक्टर ५१ महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलीच्या पालकांबरोबर आरोपीच्या घरी गेलेल्या माजी घरमालकाने सांगितलं की, ते जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा मुलगी ओळखता न येणाऱ्या परिस्थितीत होती. तिचे केस विस्कटलेले होते. तिचा हात अॅसिडने भाजला होता. तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर जखमा होत्या. याबाबतचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलं आहे.
यानंतर पीडित मुलीने सांगितलं की, आरोपींनी तिच्यावर हातोडा आणि रॉडने हल्ला केला. तसेच घरमालकाच्या दोन मुलांनी तिला विवस्त्र करत चित्रीकरण केलं. ही बाब कुणाला सांगितल्यास आई-वडिलांना मारून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. घरातील फरशी पुसत असताना आरोपीने मागून येऊन तिच्या हातावर अॅसिड ओतले. तिला झोपण्यासाठी ब्लँकेट देण्यात येत नव्हतं. ज्यामुळे तिला फरशीवर झोपायला लागायचं. मारझोड केलेला आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून आरोपी कधीकधी तिच्या तोंडात बोळा कोंबायचे, असा भयावह प्रसंग पीडित मुलीच्या आईबरोबर गेलेल्या माजी घरमालकाने सांगितला. पीडितेला सेक्टर १० मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.