नवी दिल्ली : वायव्य दिल्लीच्या जहाँगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या संबंधात दोन ‘मुख्य सूत्रधारांसह’ २० आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी दंगलविरोधी पोलिसांनी येथील रस्त्यांवर गस्त घातली आणि लोक बहुतांश घरातच थांबले.  या भागात तणावपूर्ण शांतता होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या हिंसाचाराच्या संबंधात दोन अल्पवयीन मुलांनाही पकडण्यात आले असून, हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेला सोपवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तणाव निवळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अमन (शांतता) समित्यांच्या सदस्यांसमवेत बैठक घेतली. त्यांनी अफवांना आळा घालावा आणि आपल्या भागातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करावे, असे पोलिसांनी सांगितले.

आदर्शनगरच्या भाजप नगरसेवक गरिमा गुप्ता यांनी या हिंसाचारासाठी येथे बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशींना दोषी ठरवले आणि बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या विषयांतर करत असल्याचे बैठकीतील पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला सांगितल्याचे त्या म्हणाल्या.

शनिवारी सायंकाळी दोन समुदायांत झालेली दगडफेक व जाळपोळ यात आठ पोलीस कर्मचारी व एक स्थानिक रहिवासी जखमी झाला,  काही वाहने पेटवून देण्यात आली. तेथे आता कडेकोट बंदोबस्त आहे.

या घटनेमागील ‘अवैध स्थलांतरितांच्या’ भूमिकेचा तपास करावा, अशी मागणी भाजपने केली. गेल्या ७० वर्षांत यापूर्वीच्या सरकारांनी राबवलेले तुष्टीकरणाचे राजकारण देशभरातील धार्मिक दंगलींसाठी जबाबदार असल्याचा आरोप पक्षाने केला. याउलट, सत्तेत असलेल्या लोकांमध्ये सहानुभूतीचा अभाव असल्याचे काँग्रेसने सांगितले.

या प्रकरणी विविध कलमांन्वये शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त उषा रंगनानी यांनी सांगितले. एकूण २० लोकांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले आहे. आरोपींजवळून ३ अग्निशस्त्रे व ५ तलवारी जप्त करण्यात आल्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

आरोपींपैकी मोहम्मद अस्लम याने झाडलेली गोळी दिल्ली पोलिसांच्या एका पोलीस उपनिरीक्षकाला लागली. हे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. घातक शस्त्रांनी जखमी करण्यासह विविध कलमान्वये २०२० साली अस्लमविरुद्ध जहाँगीरपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे  रंगनानी यांनी सांगितले.

हिंसाचाराच्या ‘मुख्य सूत्रधारांपैकी एक’ आणि जहाँगीरपुरीचा रहिवासी असलेला अन्सार (३५) याचा यापूर्वी हल्ल्याच्या दोन घटनांमध्ये सहभाग होता. त्याला प्रतिबंधात्मक कलमांखाली वारंवार अटक करण्यात आली होती, असे रंगनानी म्हणाल्या.

अटक करण्यात आलेल्यांपैकी १४ आरोपींना पोलिसांनी रविवारी स्थानिक न्यायालयापुढे हजर केले. दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी अस्लम व अन्सार यांना सोमवापर्यंत पोलीस कोठडी दिली, तर इतर १२ जणांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

अस्लम व अन्सार हे दंगलींमागील मुख्य सूत्रधार होते. शोभायात्रेबाबत १५ एप्रिलला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हल्ल्याचा कट रचला, असे सांगून पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

हरिद्वारमध्ये नऊ जणांना अटक 

देहरादून : उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी शरण यावे यासाठी त्यांच्या गावात पोलीस हे बुलडोझरसह पोहोचले होते, या समाजमाध्यमांवरील दाव्याचे पोलिसांनी खंडन केले आहे. त्या ठिकाणी वेगळय़ा हेतूने बुलडोझर नेण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. हरिद्वार जिल्ह्यातील दांडा जबलपूर येथे शनिवारी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत शंभर भाविक सहभागी झाले होते. ते अल्पसंख्याक वस्तीतून जात असताना तेथे दगडफेक झाली तसेच घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात आता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

कर्नुल : हिंसाचारात १० जखमी

हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या कर्नुल जिल्ह्यातील होलागुंदा येथे हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या वादातून हिंसाचार  झाला. त्यात दहा जण जखमी झाले आहेत. ही मिरवणूक एका धर्मस्थळाजवळून जात असताना भाविकांनी गाणी थांबवावीत, असे पोलिसांनी सांगितले होते. कारण त्यावेळी तेथे प्रार्थना सुरू होती. शोभायात्रेतील लोकांनी त्यावेळी गाणी थांबविली. पण नंतर पुढे गेल्यावर गाणी सुरू झाली. त्यामुळे दुसऱ्या गटातील लोक संतप्त झाले, त्यांनी दगडफेक सुरू केली, असे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 men arrested in delhi hanuman jayanti violence zws