टू जी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी या घोटाळ्याची चौकशी करणाऱया संयुक्त संसदीय समितीपुढे (जेपीसी) साक्ष देण्याची मागणी केली होती. मात्र, राजा यांना साक्षीदार म्हणून बोलावण्यापेक्षा त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्यास सांगितले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
टू जी घोटाळ्यात राजा स्वतः आरोपी आहेत. न्यायालयात या विषयाची सुनावणी सुरू असताना राजा यांनी कोणत्याही समितीपुढे साक्षीदार म्हणून उपस्थित राहून नव्याने काही माहिती देणे योग्य नसल्याचे संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी. सी चाको यांनी म्हटले आहे. समितीच्या बैठकीत सदस्यांपुढे त्यांनी आपली ही भूमिका मांडली. राजा यांना प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून बोलावण्यापेक्षा त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. राजा यांनी संसदीय समितीला लेखी निवेदन देऊन त्यामाध्यमातून आपली बाजू मांडावी, असे ठरल्याचे समजते.
टू जी परवाने देण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात तत्कालिन दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी ऐनवेळी वेगळ्या पेनाने बदल केला होता, अशी माहिती तत्कालिन सॉलिसिटर जनरल जी. ई. वहानवटी यांनी संयुक्त संसदीय समितीपुढे दिली होती. त्यानंतर राजा यांनी आपल्याला समितीपुढे साक्ष द्यायची असल्याचे म्हटले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2g case raja may be asked to submit stand in writing