नवी दिल्ली : दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्ष (आप) आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. आपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फलकबाजी सुरू केल्याचा आरोप भाजपने केला असून दिल्ली पोलिसांनी सुमारे २ हजार फलक भिंतीवरून काढून टाकले आहेत. याप्रकरणी ३६ गुन्हे दाखल झाले असून ६ जणांना अटक करण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी हटाओ, देश बचाओ, असे लिहिलेले फलक दिल्लीतील काही भागांमध्ये लावले गेले होते. हे फलक आपच्या सांगण्यावरून तयार करण्यात आले असून मोदींविरोधात जाणीवपूर्वक मोहीम राबवली जात असल्याचा भाजपचा आरोप आहे. या कथित मोहिमेवरून दिल्ली पोलिसांनीही धडक मोहिमेअंतर्गत संबंधांविरोधात कारवाईचे सत्र सुरू केले आहे.

जागोजागी हे मोठे फलक लावल्यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ झाली आहेत. शिवाय, या फलकांवर छापखान्याचे नाव लिहिलेले नाही. या दोन्ही बाबी गुन्ह्यास पात्र ठरतात. त्यामुळे एकूण १३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ३६ गुन्हे मोदीविरोधी फलक लावल्याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत. सुमारे २ हजार फलक पोलिसांनी जप्त केले असून हे फलक आपच्या मुख्यालयात पाठवले जात होते. मध्य दिल्लीतील आयपी इस्टेट भागात पोलिसांनी फलक घेऊन जाणारी गाडी अडवली होती. हे फलक आपच्या मुख्यालयात वितरित करण्यास सांगण्यात आले होते. सोमवारीदेखील असेच काही फलक आपच्या मुख्यालयात नेऊन दिले होते, अशी कबुली चालकाने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोदींविरोधातील ५० हजार फलक छापण्याचे काम मिळाले होते, असे छापखान्याच्या मालकाने पोलिसांना सांगितले असून या मालकाला अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईविरोधात आपने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारच्या हुकुमशाहीने कळस गाठला आहे. मोदींनी १०० गुन्हे दाखल करावेत असे या फलकांवर आक्षेपार्ह काय आहे?.. मोदीजी तुम्हाला माहिती नसेल भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. एका फलकाला इतके कशासाठी घाबरायचे?.. असे ट्वीट आपने केले आहे. आपमध्ये थेट हल्लाबोल करण्याची हिंमत नसल्याने त्यांनी पोस्टरबाजी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे, असा टोला दिल्ली भाजपचे प्रवक्ता हरीश खुराणा यांनी मारला.

सिसोदियांना न्यायालयीन कोठडी

मद्यधोरण घोटाळय़ातील आरोपी व आपचे नेते मनीष सिसोदिया यांची ५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिसोदियांना ९ मार्च रोजी अटक केली होती. विशेष न्यायालयाने त्यांना १३ दिवसांची ईडी कोठडी दिली होती. या आधी सिसोदियांना सीबीआयनेही अटक केली होती. सिसोदियांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 arrested in delhi for putting up objectionable posters against pm narendra modi zws