अमेरिकी ड्रोन हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी अपहरण केलेल्या अमेरिकी स्वयंसेवी नागरिकाचा व्हिडीओ प्रसारित करून अल् काईदाने खळबळ उडवून दिली आहे. २०११ साली अपहरण करण्यात आलेला अमेरिकी नागरिक या व्हिडीओमध्ये आपल्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना विनंती करीत असल्याचे दिसत आहे. वॉरन वेइनस्टेन असे या अपहरण करण्यात आलेल्या अमेरिकी नागरिकाचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकी सरकारच्या पाकिस्तानमधील एका प्रकल्पामध्ये सल्लागारपदी काम करीत असताना अल् कायदाने मला डांबून ठेवले असून माझा सगळ्यांना विसर पडला असल्याचे वाटत आहे, असे वॉरन व्हिडीओमध्ये सांगत आहेत. वॉरन गेली ९ वर्षे पाकिस्तानमध्ये कामानिमित्त राहत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपहरण कारण
अमेरिकी चालकविरहित विमानांचा (ड्रोन) हल्ला थांबत नाही, तोवर वॉरन यांना सोडण्यात येणार नसल्याचे अल् कायदाचा म्होरक्या जवाहिरी याने डिसेंबर २०११ साली व्हिडीओद्वारे स्पष्ट केले होते. अमेरिकेने दहशतवादविरोधी कारवायांअंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान, सोमालिया आणि येमेन या अल् कायदाच्या सक्रिय पट्टय़ांवर ड्रोन हल्ले सुरू केले होते. त्याचा निषेध करत जवाहरी याने अपहरणाचे समर्थन केले होते. अल् कायदाच्या व्हिडीओमुळे वॉरन जिवंत असल्याचा पुरावा मिळाल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

व्हिडीओ प्रसारण सुमारे १३ मिनिटांचा हा व्हिडीओ अल् काईदाने प्रसार माध्यमांना पाठविला आहे. अमेरिकेने परवानगी दिल्यास आपल्या नातेवाइकांना भेटू देण्यास अपहरणकर्ते तयार होतील, असे या व्हिडीओमध्ये वॉरन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या बंदिवासात असलेल्या अल् कायदाच्या म्होरक्यांना सोडल्यास आपल्या सुटकेचाही विचार होईल, असे या व्हिडीओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्या सुटकेबाबत जनमत घेण्याचे आवाहनही त्यांनी व्हिडीओमध्ये केले आहे.

ताजा ड्रोन हल्ला
या व्हिडीओद्वारे अमेरिकेवर दहशत पसरविण्याच्या पवित्र्यात असलेल्या अल् कायदाला गुरुवारी चाप बसला आहे. वजिरीस्तानमध्ये अमेरिकी ड्रोन हल्ल्यात चार संशयित दहशतवादी ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे. मीरानशाह भागामध्ये दहशतवादी लपून बसलेल्या घरावर ड्रोनमधून दोन अग्निबाण डागण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American abducted by al qaeda makes video plea