एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या गदारोळात संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन निष्फळ ठरल्याचा निषेध म्हणून मोदी हे गुरूवारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्याचा समाचार घेत हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. संसदेत गोंधळ करणाऱ्या खासदारांना निलंबित करण्याचा लोकसभा अध्यक्षांना अधिकार आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या खासदारांना निलंबित केले होते. मग यावेळी ही असंच करायला हवं होतं. पण नीरव मोदी, मेहुल चौकसीबाबत संसदेत उत्तर द्यावं लागलं असतं. त्यांना अविश्वास ठरावावर चर्चा नको होती, असा गंभीर आरोप ओवेसी यांनी केला. पंतप्रधान आपल्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून उपोषण का करत नाहीत, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी लढताना प्राण गमावला त्यांच्यासाठी ते का उपोषण करत नाहीत, असा सवालही उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाच्या वतीने उद्या देशभरात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह हे कर्नाटकात उपोषण करणार आहेत. तर भाजपाचे खासदार त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात उपोषण करतील. भाजपाच्या या कृतीचा ओवेसी यांनी समाचार घेतला. भाजपाचा हा दुटप्पीपणा असल्याची टीका त्यांनी केली.

आपल्या खोट्या आश्वासनाचा निषेध म्हणून मोदी उपोषणाला बसणार काय, शेतकऱ्यांसाठी ते उपोषणाला बसणार काय, दलितांवरील अत्याचाराचा निषेध, युवकांना रोजगार देण्यात आलेले अपयश याचा निषेध करण्यासाठी मोदी उपोषणाला बसणार काय असा, थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi aimim criticized on bjp pm narendra modi for one day fast congress parliament