फ्रान्सची राजधानी असलेले पॅरिस शुक्रवारी रात्री भीषण दहशतवादी हल्ल्यांनी हादरले. पॅरिसमधील रेस्टाँरंट, कॉन्सर्ट हॉल आणि नॅशनल स्टेडियमसह तब्बल सात ठिकाणांना बंदुकधारी हल्लेखोर आणि आत्मघातकी बॉम्बस्फोटांनी लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात तब्बल १५३ जणांचा मृत्यू झाल्याचे कळत असून २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत तर ८० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.  दरम्यान, फ्रान्सचे पोलीस दल आणि दहशतवाद्यांमध्ये काही तास सुरू असलेल्या चकमकीत सर्व हल्लेखोरांना ठार करण्यात यश आल्याची माहिती फ्रान्सच्या तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरिसमधील या हल्ल्यांमध्ये बॅटकला कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवाद्याच्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक हानी झाली असून याठिकाणी १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅरिस सिटी हॉलच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कमांडोंनी केलेल्या कारवाईत या हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात आले असून त्याठिकाणी अडकून पडलेल्या डझनभर नागरिकांचीही सुटका करण्यात आली. याशिवाय, पॅरिसमधील अन्य ठिकाणी झालेल्या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नॅशनल स्टेडियममधील दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यांचा समावेश आहे. नॅशनल स्टेडियममधील फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील हा फुटबॉल सामना पाहण्यासाठी याठिकाणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस होलांद हेदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांना स्टेडियममधून तत्काळ सुखरूपणे बाहेर काढण्यात आले.
या हल्ल्यांनंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद करत आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्समध्ये विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. दरम्यान, फ्रान्समधले सगळे भारतीय सुरक्षित असल्याची माहिती भारतीय अधिका-यांनी दिली आहे. फ्रान्सने सीरियामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पॅरीसमध्ये हल्ला केल्याचा दावा दहशतवाद्यांनी केला आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने पॅरिसवरील हल्ल्याचे जाहीर कौतुक केले असून त्याची जबाबदारी स्विकारली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At least 150 people killed in multiple attacks across paris all attackers believed to be dead