एकमेकांवर सातत्याने कुरघोडी करणारे शिवसेना आणि भाजपमधील संबंध आता आणखीनच ताणले जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आघाडीच्या सर्व खासदारांना अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये समजावून सांगण्यासाठी भाजपकडून एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसाठी ‘रालोआ’तील मित्रपक्षांच्या खासदारांनाही निमंत्रित केले होते. मात्र, समन्वयाअभावी ‘रालोआ’तील जुना घटक असलेल्या शिवसेनेला निमंत्रणच द्यायचे राहून गेल्याने दोन्ही पक्षात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्यावरून गदारोळ निर्माण होण्याची चिन्हे दिसताच भाजपकडून समन्वयाच्या अभावामुळे हा सर्व प्रकार घडल्याची सारवासारव करण्यात आली. मित्रपक्षाच्या खासदारांना बैठकीसाठी आमंत्रित करण्याची जबाबदारी राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, लोकसभेत २२ आणि राज्यसभेत ३ खासदार असलेल्या शिवसेनेला या बैठकीचे निमंत्रण मिळालेच नाही. दरम्यान, या चुकीसाठी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राजीवप्रताप रुडी यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते.
याबाबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, की आम्हाला बैठकीला बोलवायला हवे होते; मात्र ना निमंत्रण आले, ना कोणी सांगितले. आम्ही खरेच नाराज आहोत. ही नाराजी आम्ही केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे व्यक्त करणार आहोत. जेणेकरून, भाजपला त्यांची चूक समजून येईल. आम्हाला या गोष्टीचे भांडवल करायचे नाही. ‘रालोआ’चे इतर सदस्य राज्यातील स्वाभिमानी शेतकरी आघाडीचे खासदार राजू शेट्टी यांनाही भाजपने रालोआ बैठकीला बोलावले नाही.
राज्यातदेखील एकत्रित सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या कारणांवरून खटके उडताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगल्याचेही पहायला मिळाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2016 रोजी प्रकाशित
‘रालोआ’च्या बैठकीला शिवसेनेला निमंत्रणच नाही
मित्रपक्षाच्या खासदारांना बैठकीसाठी आमंत्रित करण्याची जबाबदारी राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांच्याकडे देण्यात आली होती
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-03-2016 at 10:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp not invited shivsena mla for nda meeting