दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उलाढाल लाखांवरुन काही हजारांमध्ये

पूर्वी कार्यकर्ता म्हटल्यावर टोपी ही त्याची ओळख असायची. त्यातही काँग्रेसकडे त्याचा मक्ता अधिक. पण काळाचा महिमा असा की आता हीच गांधी नामाची टोपी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. अगदी निवडणूक काळातही ती दुर्मीळ झाली आहे. निवडणूक प्रचाराचा मुहूर्त, उमेदवारी अर्ज दाखल करणे अशा एक-दोन मोजक्या प्रसंगांइतकेच पांढऱ्या टोपीचे महत्त्व उरले आहे.

कार्यकर्त्यांला टोपी आपलीशी वाटेना. बदलत्या फॅशनचा परिणाम म्हणूनही कोणी टोपीला जवळ करेनासा झाला. किंबहुना तिचे स्थान निमित्तमात्र उरले आहे. टोपीची विक्रीही घटली आहे. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी ‘आमच्याकडून ३-४ दशकांपूर्वी वर्षांकाठी लाखभर रुपयांच्या टोप्यांची विक्री व्हायची. आता ती १०-१५ हजारापर्यंत कमी झाली आहे. केवळ मतांपुरता गांधींचा वापर केला जात आहे.’ अशी खंत त्यांनी ‘लोकसत्ता‘शी बोलताना व्यक्त केली.

काँग्रेसकडून विरोधकांकडे?

गांधी, नेहरू, शास्त्री यांचा वारसा लाभलेली टोपी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पुढे कैक वर्षे चालवली. साने गुरुजी, यशवंतराव चव्हाण यांनी लौकिक मिळवून दिलेल्या टोपीची परंपरा नंतरच्या काळात बाळासाहेब विखे पाटील, राजारामबापू पाटील, शंकरराव चव्हाण, शंकरराव मोहिते यांनी चालवली खरी. पण आता त्यांचेच वारसदार टोपीकडे मान वळवताना दिसतात, तेथे सामान्य कार्यकर्त्यांचे काय घेऊन बसायचे अशी अवस्था आहे. भाजप नेते हरिभाऊ  बागडे यांच्यासारखे भाजपचे नेते आजही टोपी परिधान करतात. काँग्रेसचा वारसा असा सत्तेपाठोपाठ भाजपकडे काही अंशी येताना दिसतो आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cap is only for excuse in politics