इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही त्यांनी आपल्या पक्षातर्फे काढलेला मोर्चा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या ‘तहरीक-ए-इन्साफ पार्टी’ने (पीटीआय) काढलेल्या मोर्चात पंजाब प्रांतात हा हल्ला झाला होता. या वेळी हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात या मोर्चात ट्रकमधून निघालेल्या सत्तर वर्षीय इम्रान यांच्या पायाला दुखापत झाली आहे. या हल्ल्यात एक मृत्युमुखी पडला असून, सात जण जखमी झाले आहेत. इम्रान यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांचा धोका टळल्याची माहिती पक्षातर्फे शुक्रवारी देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षाचे वरिष्ठ नेते फवाद चौधरी यांनी आरोप केला, की हा इम्रान यांच्या हत्येचा हा सुनियोजित कट होता. त्यांच्या हत्येच्या प्रयत्नात सुदैवाने ते थोडक्यात वाचले आहेत. हा हल्ला कुठल्या पिस्तुलाने नव्हे तर स्वयंचलित शस्त्राद्वारे करण्यात आला आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात एक जण मृत्युमुखी पडला असून, १४ जण जखमी झाले आहेत. लाहोर येथे इम्रान यांनीच उभारलेल्या शौकत खानम रुग्णालयात इम्रान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. हा मोर्चा पुढे सुरू ठेवण्याचा इम्रान यांचा निर्धार आहे. पार्टीच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर इम्रान यांना उदधृत करत म्हटले आहे, की मी झुकणार नाही. पाकिस्तानवासीयांसाठी ‘खरे स्वातंत्र्य’ मिळवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हा मोर्चा शुक्रवारी सकाळी अकराला वजिराबाद येथून पुढे निघाला.

पंजाब पोलिसांवर कारवाई

लाहोर : इम्रान यांच्यावर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोराची हल्ल्याची कबुली देणारी चित्रफीत सार्वजनिक रीत्या प्रसृत केल्याबद्दल पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री चौधरी परवेज़ इलाही यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. इलाही यांनी या बेजबाबदारपणाबद्दल संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पंजाब पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत. ही चित्रफीत सार्वजनिक रीत्या प्रसृत केल्याबद्दल संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी व अन्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day after attack on imran khan supporters continues long march from lahore to islamabad zws