इंग्लंडचा आठ गडी राखून सहज विजय
इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यानंतर जो रूटच्या दुसऱ्या शतकी खेळीमुळे इंग्लंडने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. विंडीजला २१२ धावांवर गुंडाळल्यानंतर रूटच्या शतकामुळे इंग्लंडने ३३.१ षटकांत हे आव्हान सहज पार केले.
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी आपल्या वेगवान आणि धारदार उसळत्या चेंडूंनी पाकिस्तानला घायाळ केले होते. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी हीच रणनीती त्यांच्याविरुद्ध वापरली. जोफ्रा आर्चर, मार्क वूड यांच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज पुरते निष्प्रभ ठरले. निकोलस पूरनने (६३) कारकीर्दीतील पहिले एकदिवसीय शतक साकारले, पण वेस्ट इंडिजचा डाव ४४.४ षटकांत २१२ धावांवर आटोपला.
हे आव्हान पार करताना जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी वेस्ट इंडिजच्या उसळत्या चेंडूंचा सहजपणे सामना केला. जेसन रॉय क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाल्यामुळे रूटला सलामीला उतरावे लागले. पण या दोघांनी पहिल्या गडय़ासाठी ९५ धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयाची पायाभरणी केली. बेअरस्टो ४५ धावांवर बाद झाल्यानंतर रूटने ख्रिस वोक्सच्या साथीने दुसऱ्या गडय़ासाठी १०४ धावा जोडल्या. यादरम्यान रूटने यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक साजरे केले. त्यानंतर बेन स्टोक्सच्या (नाबाद १०) साथीने रूटने इंग्लंडला विजय मिळवून दिला. रूटने ९४ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद १०० धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : ४४.४ षटकांत सर्व बाद २१२ (निकोलस पूरन ६३, शिमरॉन हेटमेयर ३९, ख्रिस गेल ३६; मार्क वूड ३/१८, जोफ्रा आर्चर ३/३०) पराभूत वि. इंग्लंड : ३३.१ षटकांत २ बाद २१३ (जो रूट नाबाद १००, जॉनी बेअरस्टो ४५; शॅनन गॅब्रियल २/४९)