Gujarat’s Patel became Pakistan’s Hussain : अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या वेगवेगळ्या देशाच्या नागरिकांना परत पाठवलं जात आहे. दरम्यान, हे हजारो लोक अमेरिकेत कसे दाखल झाले होते असाही प्रश्न सर्वांना पडला आहे. हजारो लोक जीवघेण्या मार्गांचा अवलंब करून अमेरिकेत घुसखोरी करतात, डाँकी अथवा डंकी मार्ग हा त्यापैकीच एक आहे. अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी लोक वाट्टेल ते मार्ग स्वीकारतात. गुजरातमधील ए. सी. पटेल याने देखील अमेरिकेत घुसखोरी केली होती. त्यासाठी तो चक्क पाकिस्तानी नागरिक बनला होता. ज्याला आता अमेरिकेने भारतात परत पाठवलं आहे. ए. सी. पटेल बनावट पासपोर्ट बनवून पाकिस्तानी नागरिक बनला. त्यासाठी त्याने मोहम्मद नजीर हुसैन हे नाव धारण केलं होतं. मात्र अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद नजीर हुसैन बनलेल्या एसी पटेलची चोरी पकडली गेली आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पटेलला १२ फेब्रुवारी रोजी लष्करी विमानाने भारतात माघारी धाडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना पुन्हा भारतात पाठवले जात आहे. अशा स्थलांतरितांना घेऊन जाणारी अमेरिकेची लष्करी विमानं दोन आठवड्यांपूर्वी भारतात दाखल झाली. ही कारवाई पुढेही चालू राहील व बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी रवाना केलं जाणार आहे. अमेरिकेने आतापर्यंत तब्बल ३३२ स्थलांतरितांना भारतात पाठवलं आहे. यापैकी ७४ गुजरातचे रहिवासी आहेत.

पटेलविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद

अमेरिकेने ए. सी. पटेलला भारतात परत पाठवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला विमानतळावरूनच ताब्यात घेतलं. पटेलवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये फसवणूक, पासपोर्टचा दुरुपयोग, बनावट पासपोर्ट बनवण्यासह इतर अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे.

पटेलकडे बनावट नव्हे खरा पासपोर्ट होता?

ए. सी. पटेलची चौकशी करत असताना व त्याच्याकडे असणारे दस्तावेज तपासत असताना दिल्ली पोलिसांचं लक्ष एका गोष्टीने वेधलं, ती गोष्ट म्हणजे पटेलकडील पासपोर्ट. पटेलकडे असलेला पासपोर्ट पाहून पोलिसांना धक्का बसला. कारण पटेलकडे पाकिस्तानी पासपोर्ट व पाकिस्तानचं नागरिकत्व असलेले कागदपत्र होते. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर लक्षात आलं की हे कागदपत्र बनावट नाहीत. पाकिस्तानी नागरिक नजीर हुसैन याचाच पासपोर्ट पटेल घेऊन फिरत होता. नजीरने त्याचा पासपोर्ट हरवला होता. गुजरातमधील एका एजंटने तो पासपोर्ट पटेलला विकला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat patel became pakistani mohammad najir hussain illegal immrgrant deported from us asc