प्लूटो बटू ग्रहावरील हृदयाच्या आकाराचा नायट्रोजन हिमनदीचा भाग कसा तयार झाला असावा याचे कोडे वैज्ञानिकांनी उलगडले आहे. नासाच्या प्लुटो न्यू होरायझन्स यानाने गेल्या वर्षी बर्फाळ प्लुटो ग्रहाचे निरीक्षण केले होते. फ्रान्समधील एका प्रयोगशाळेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की प्लूटो हा वेगळा ग्रह आहे. तेथे नायट्रोजनचे संघनन विषुववृत्तावर अत्यंत कमी उंचीच्या भागात झाले आहे. त्यामुळे स्पुटनिक प्लॅनम भागात बर्फाचे अनेक थर साठलेले आहेत. प्लूटोवरील इतर घटकांचे वितरण व वातावरणातील त्यांच्या प्रमाणाचा विचार करण्यात आला आहे. प्लूटोच्या पृष्ठभागावरील बर्फ व नायट्रोजन अस्थिर असून जेव्हा त्याचे संप्लवन होते, तेव्हा तपमान उणे २३५ अंश असते. यात विरळ वातावरणाचा थर बर्फाच्या विवरात तयार झाला आहे. न्यू होरायझन्स यानाने प्लूटोजवळून जुलैत प्रवास केला असून त्यात संबंधित विवरातील घन नायट्रोजन हा खूप वस्तुमानाचा असल्याचे म्हटले आहे, स्पुटनिक प्लानम भागात त्याचे प्रमाण जास्त आहे. मिथेनचे धुके उत्तर अर्धगोलार्धात असून विषुववृत्तावरही ते सापडते. कार्बन मोनॉक्साइडचा बर्फ स्पुटनिक प्लानम या भागात सापडतो.
आतापर्यंत प्लूटोवर बर्फ नेमके कसे पसरले गेले आहे, याचा अंदाज आला नव्हता. वैज्ञानिकांनी प्लूटो या बटू ग्रहाचे अंकीय प्रारूप तयार केले असून नायट्रोजन, मिथेन व कार्बन डायॉक्साइड यांसारख्या चक्रांचे त्यात सादृश्यीकरण करण्यात आले. प्लूटोवर घन व वायू यांचा समतोल बघितला, तर त्याला स्पुटनिक प्लानममध्ये अडकलेले बर्फ कारणीभूत आहे.