पीटीआय, इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोरमधील निवासस्थानातून शस्त्रे व पेट्रोल बॉम्ब जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केल्यानंतर, इम्रान अध्यक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्सान पक्षाला ‘प्रतिबंधित’ संघटना जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्याचा सरकारचा विचार असल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री राणा सनाउल्ला यांनी म्हटले आहे.
खान हे इस्लामाबादमध्ये असताना, पंजाब पोलिसांच्या दहा हजारांहून अधिक सशस्त्र कर्मचाऱ्यांनी लाहोरच्या झमन पार्कमधील त्यांच्या निवासस्थानी मोठी मोहीम हाती घेतली, त्यांच्या अनेक समर्थकांना अटक केली आणि शस्त्रे व पेट्रोल बॉम्ब जप्त केल्याचा दावा केला. पीटीआयला प्रतिबंधित संघटना जाहीर करण्यासाठी प्रक्रिया सुरू करता येईल काय, याबाबत सरकार कायदेतज्ज्ञांशी विचारविनिमय करेल, असे सनाउल्ला यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
इम्रान खान यांच्याविरुद्ध दहशतवादाचा गुन्हा
इस्लामाबाद : विध्वंसक कृत्यात सहभागी होणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे आणि आपल्या विरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वी येथील न्यायालयीन संकुलाबाहेर असंतोष निर्माण करणे या आरोपांखाली पाकिस्तान पोलिसांनी रविवारी इम्रान खान यांच्याविरुद्ध दहशतवादाचा गुन्हा दाखल केला.
झमन पार्कमध्ये (इम्रान खान यांचे लाहोरमधील निवासस्तान) दहशतवादी लपलेले होते. इम्रान खान यांच्या घरातून शस्त्रे, पेट्रोल बॉम्ब, इ. जप्त करण्यात आले असून, पीटीआय ही दहशतवादी संघटना असल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी हा पुरेसा पुरावा आहे.
– राणा सनाउल्ला, पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री.