ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीय वंशाच्या महिला डॉक्टरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रीती रेड्डी (वय ३२) असे या महिला डॉक्टरचे नाव असून रेड्डी कुटुंबीय मूळचे तेलंगणाचे आहेत. पूर्वाश्रमीच्या प्रियकराने तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत असून त्याचा देखील कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे.
सिडनीत राहणारी प्रीती रेड्डी ही डेंटिस्ट होती. ती रविवारपासून बेपत्ता होती. तिच्या बहिणीने प्रीती बेपत्ता असल्यासंदर्भात फेसबुकवर मोहीम देखील सुरु केली होती. अखेर मंगळवारी रात्री तिचा मृतदेह तिच्याच कारमधील सुटकेसमध्ये सापडला. प्रीती आणि तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर हर्ष नरदे हे दोघे वैद्यकीय क्षेत्रातील कॉन्फरन्ससाठी गेले होते. प्रीती बेपत्ता होण्यापूर्वी ती हर्ष नरदेसोबतच दिसली होती. त्यानंतर प्रीती रविवारी रात्री २.१५ वाजता सिडनीच्या स्टँड आर्केड मॅकडोनाल्डच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली होती.
विशेष बाब म्हणजे प्रीती बेपत्ता असल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी हर्ष नरदेची चौकशी देखील केली होती. मात्र, तोवर प्रीतीची हत्या झाल्याचे उघड झाले नव्हते. तसेच चौकशीत काही संशयास्पद बाब न आढळल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. हर्ष नरदेचा जाणूनबुजून कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली, असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. प्रीतीच्या हत्येबद्दल कोणाकडे माहिती असल्यास कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian origin dentist preethi reddy body found in in sydney