बंदुकीचा धाक दाखवून माझे पाकिस्तानी तरुणाशी लग्न लावून दिले असे आरोप २० वर्षीय भारतीय तरुणाीने केला आहे. उझमा असे या तरुणीचे नाव असून सध्या उझमा पाकिस्तानमधील भारतीय दुतावासात ठाण मांडून आहे. या तरुणीला आता भारतात परतायचे असून माझ्याकडील महत्त्वाची कागदपत्रही हिसकावण्यात आल्याचे या तरुणीचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उझमा ही २० वर्षीय भारतीय तरुणी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. उझमाने आता पाकिस्तानमधील भारतीय दुतावासात धाव घेतली आहे. बंदुकीचा धाक दाखवून माझे पाकिस्तानमधील तरुणाशी लग्न लावून देण्यात आले असा आरोप उझमाने केला आहे. उझमाने इस्लामाबादमधील न्यायालयातही पती ताहीर अलीविरोधात याचिका दाखल केली आहे. ताहिरने माझा छळ केल्याचे तिने याचिकेत म्हटले आहे. माझ्याकडील व्हिसा, पासपोर्ट अशी महत्त्वाची कागदपत्रही हिसकावून घेण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. मला जोपर्यंत सुखरुप भारतात सोडले जात नाही तोपर्यंत मी भारतीय दुतावासातून बाहेर पडणार नाही असे सांगत उझमाने दुतावासात ठाण मांडले आहे. सोमवारी सकाळी उझमाच्या पतीने तिची भेट घेतली. पण त्यानंतरही उझमा भारतात परतण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

उझमाने पाकिस्तानी दुतावासाकडे व्हिसासाठी अर्ज करताना पाकिस्तानमध्ये नातेवाईकांची भेट घ्यायची आहे असे कारण दिल्याचे पाकच्या दिल्लीतील दुतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तिचे पाकमध्ये लग्न आहे याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती असे दुतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यातही उझमा पाकिस्तानमधील भारतीय दुतावासात गेली होती. मला पुन्हा भारतात जायचे आहे असे तिने दुतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. उझमा आणि ताहिर या दोघांची मलेशियात ओळख झाली होती. यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले होते असे सूत्रांनी सांगितले. ताहिरने दुसरीकडे भारतीय दुतावासावर आरोप केले आहे. माझ्या पत्नीला भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांनी डांबून ठेवल्याचे ताहिरने म्हटले आहे. या संदर्भात दोन्ही देशांमधील अधिकारी संपर्कात असून उझमाच्या पालकांशीही संपर्क साधण्यात आला आहे. उझमा १ मेरोजी वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानमध्ये दाखल झाली होती. ३ मेरोजी तिने पाकिस्तानी तरुणाशी निकाह केल्याचे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian woman allages forced to marry pakistan man on gun point islamabad indian high commission