कारवाँ या मासिकातील बदनामीकारक लेखाचा दाखला दिल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पुत्र विवेक डोवल यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना दिल्लीतील कोर्टाने बुधवारी जामीन मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या महिन्यात कोर्टाने रमेश यांना प्रत्यक्ष कोर्टात हजेरी लावण्याबाबत सूट दिली होती. मात्र, यावेळी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणात कारवाँ मासिकाच्या संपादकाला आणि एका रिपोर्टरलाही यापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कारवाँ मासिकात कौशल श्रॉफ यांनी विवेक डोवल यांच्यावर आरोपा करणारा लेख लिहिला होता. तसेच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्याच लेखातील आरोपांचा पुनरुच्चार करीत १७ जानेवारीला पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, या लेखातील माहिती निराधार असल्याचा दावा विवेक डोवाल यांनी केला होता.

त्यामुळे कारवाँ मासिक, कौशल श्रॉफ, जयराम रमेश यांच्या विरोधात विवेक डोवल यांनी बदनामीचा खटला दाखल केला होता. कारवाँ नियतकालिकातील दी डी कंपनीज या लेखात विवेक डोवाल यांच्यावर आरोप करताना २०१६ मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर काही दिवसांत विवेक डोवाल यांनी केमन बेटांवर मोठी गुंतवणूक केली होती त्यामुळे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीत मोठी वाढ झाल्याचा दावा करण्यात आला होता.

रमेश यांनी पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली होती की, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान केमन बेटांवरुन आलेल्या ८३०० कोटी रुपयांच्या थेट परकीय गुंतवणुकीची माहिती सार्वजनिक करायला हवी तसेच याची संपूर्ण चौकशीही व्हायला हवी.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jairam ramesh gets bail in defamation case by nsa ajit dovals son