नवी दिल्ली : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत १२ पैकी ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून भाजपला ८ तर, ‘रालोआ’तील दोन घटक पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. काँग्रेसलाही एक जागा जिंकता आली. त्रिपुरामधील एका जागेसाठी ३ सप्टेंबरला मतदान होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या निकालामुळे भाजपचे संख्याबळ ९५ तर, ‘रालोआ’चे संख्याबळ ११२ झाले आहे. राज्यसभेच्या २४५ जागांपैकी जम्मू-काश्मीरमधील व नियुक्त प्रत्येकी चार अशा ८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तरी वरिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्या २३७ असून बहुमतासाठी ११९ इतक्या संख्याबळाची गरज आहे. ‘रालोआ’ला सहा नियुक्त सदस्य व एका अपक्षाचा पाठिंबा असल्याने ‘एनडीए’चे एकूण संख्याबळ ११९ झाले असून त्रिपुराची जागा जिंकल्यानंतर हे संख्याबळ १२० होईल. त्यामुळे राज्यसभेत ‘रालोआ’ला पूर्ण बहुमत मिळाले आहे.

हेही वाचा…इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यसभेतील दहा सदस्य विजयी झाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. शिवाय, बिजू जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ममता मोहंता यांनी राजीनामा दिला होता. तेलंगणामध्ये के. केशवराव यांची जागाही रिक्त झाली होती.

निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांमध्ये आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरियाणातून किरण चौधरी आणि मध्य प्रदेशमधून केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन, ओडिशातील ममता मोहंता, राजस्थानमधून रवनीत सिंग बिट्टू, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे. ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतदानानंतर त्रिपुरामधून संख्याबळाच्या आधारावर राजीव भट्टाचार्य विजयी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या मित्रपक्षांपैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन पाटील महाराष्ट्रातून विजयी झाले, तर ‘आरएलएम’चे उपेंद्र कुशवाह यांनी बिहारमधून एक जागा जिंकली.

हेही वाचा…बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद – ममता बॅनर्जी; ‘लवकरच कायद्यात सुधारणा’

‘इंडिया’चे संख्याबळ ८५

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी तेलंगणातून निवडून आले. वरिष्ठ सभागृहात काँग्रेसचे संख्याबळ २७ तर ‘इंडिया’चे संख्याबळ ८५ झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nda achieves full majority seats in rajya sabha bypolls elections psg