तलाक-ए-हसनला आव्हान देणारी याचिका दाखल; दिल्ली हायकोर्टाची पोलीस व पतीला नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने तलाक-ए-हसनच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर नोटीस बजावली आहे.

Delhi High Court
दिल्ली उच्च न्यायालय

तलाक-ए-हसनच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी २ मे रोजी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये मुस्लिम महिलेने तलाक-ए-हसन आणि इतर सर्व प्रकारचे एकतर्फी वैवाहिक घटस्फोट असंवैधानिक म्हणून घोषित करण्याची विनंती केली होती. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की ती तलाक-ए-हसनची बळी ठरली आहे. त्यानंतर सोमवारी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने तलाक-ए-हसनच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या खंडपीठाने दिल्ली पोलिसांकडून तसेच ज्या मुस्लिम पुरुषाच्या पत्नीने तलाक-ए-हसन नोटीसला आव्हान देत कोर्टात धाव घेतली आहे, त्यांच्याकडून उत्तर मागितले.

तलाक-ए-हसन म्हणजे काय?

तलाक-ए-हसननुसार, मुस्लिम पुरुष आपल्या पत्नीला महिन्यातून एकदा तोंडी किंवा लेखी तलाक देतो आणि असे सलग तीन महिने केल्यानंतर औपचारिकपणे घटस्फोट मंजूर केला जातो. तलाक-ए-हसन संविधानाच्या विरोधात आहे आणि मुस्लिम विवाह कायदा १९३९ अंतर्गत एकतर्फी घटस्फोट घेण्याचा अधिकार फक्त पुरुषांना आहे. केंद्र सरकारने महिला आणि पुरुष सर्व धर्मीयांसाठी समान तलाकचा कायदा करावा, अशी मागणी काही मुस्लिम महिलांकडून करण्यात येत आहे.

तलाक-ए-एहसान

इस्लाममध्ये तलाक देण्याचे तीन मुख्य मार्ग आहेत. यामध्ये तलाक-ए-एहसान, तलाक-ए-हसन आणि तलाक-ए-बिद्दत यांचा समावेश आहे. तलाक-ए-एहसानमध्ये तीन महिन्यांत घटस्फोट दिला जातो. यामध्ये तीनदा तलाक म्हणण्याची गरज नाही. यामध्ये एकदा घटस्फोट झाला की पती-पत्नी तीन महिने एकाच छताखाली राहतात. तीन महिन्यांत दोघांचेही पटले तर घटस्फोट होत नाही. यात पती इच्छा असल्यास तीन महिन्यांत घटस्फोट मागे घेऊ शकतो. इच्छा नसल्यास महिलेचा घटस्फोट होतो. मात्र, पती-पत्नी यांची इच्छा असल्यास पुनर्विवाह करू शकतात.

तलाक-ए-हसन

‘तलाक-ए-हसन’ मध्ये, तीन महिन्यांच्या कालावधीत दर महिन्याला एकदा तलाक म्हणतात. तिसऱ्या महिन्यात तिसर्‍यांदा तलाक म्हटल्यानंतर तलाकला औपचारिक मान्यता दिली जाते. तिसर्‍यांदा तलाक न म्हटल्यास विवाह कायम राहतो. या घटस्फोटानंतरही पती-पत्नी पुन्हा लग्न करू शकतात. मात्र, पत्नीला हलाला सहन करावा लागतो. हलाला म्हणजे स्त्रीला दुसऱ्या पुरुषाशी लग्न केल्यानंतर घटस्फोट द्यावा लागतो.

तलाक-ए-बिद्दत

तलाक-ए-बिद्दतमध्ये, पती आपल्या पत्नीला कधीही, कुठेही, फोनवर किंवा लेखी तलाक देऊ शकतो. यानंतर विवाह लगेच संपतो. यामध्ये एकदा तीनदा तलाक म्हटले की ते परत घेता येत नाही. या प्रक्रियेत घटस्फोटित जोडीदार पुनर्विवाह करू शकतात. मात्र, त्यासाठी हलालाची प्रक्रिया अवलंबली जाते. इस्लाममध्ये घटस्फोट घेण्याचे आणि देण्याचे इतर मार्ग देखील अस्तित्वात आहेत. बहुसंख्य मुस्लिम उलेमांचे असेही मत होते की तलाक-ए-बिद्दतची व्यवस्था कुराणानुसार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notice of talaq e hasan delhi hc seeks response woman husband police commissioner abn

Next Story
बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याने ११ जुलैआधी बहुमत चाचणी होणार की नाही?; सर्वोच्च न्यायालय म्हणालं…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी