निरागस ज्यू नागरिकांना निष्कारण मृत्युभेट देणाऱ्या नराधम अ‍ॅडॉल्फ हिटलर याने उभारलेल्या छळछावण्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हिटलरच्या दहशतीच्या राजवटीत म्हणजेच १९३३ ते १९४५ दरम्यान ही आकडेवारी सात हजार इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र आता ही संख्या त्याच्या सहापटीपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे ४२ हजार ५० इतकी असल्याचे उघडकीस आले आहे.
अमेरिकेच्या विध्वंस स्मारक संग्रहालयाच्या संशोधकांनी यासंबंधात सूची तयार केली आहे. युरोप, जर्मनी आणि तत्कालीन जर्मनीच्या नियंत्रणाखाली असलेल्या फ्रान्सपासून रशियापर्यंतच्या भागांत या छळछावण्या होत्या, असे निष्पन्न झाले आहे. ही संख्या इतिहासतज्ज्ञांनी बांधलेल्या अंदाजापेक्षा खूपच अधिक आहे, असे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.
संशोधकांच्या या चमूने संपूर्ण युरोपात असलेल्या छळछावण्यांची स्थाने व नकाशेही तयार केले आहेत. या काळात सुमारे १५ ते २० दशलक्ष लोकांना तुरुंगवास वा मृत्यूला सामोरे जावे लागले होते. जेफ्री मेगार्दी आणि मार्टिन डिन यांनी संशोधकांच्या या चमूचे नेतृत्व केले असून हजारो नकाशे व माहिती संकलित केली असून त्याचे प्रकाशन या संग्रहालयातर्फे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of nazi torture camp is shocking