दहशतवादी गटांवर कारवाई करण्याबाबत जगभरातून दबाव येत असलेल्या पाकिस्तानने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीझ सईद हा चालवत असलेले मदरसे आणि एक दवाखाना यांच्यावर कारवाई सुरू केल्याचे एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेले गट आणि व्यक्ती यांच्याविरुद्धच्या कारवाईच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी या संघटनेच्या र्निबध समितीच्या एका उच्चस्तरीय चमूने गेल्या महिन्यात पाकिस्तानला भेट दिल्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे.
पंजाब सरकारच्या आदेशानुसार रावळपिंडीच्या जिल्हा प्रशासनाने सईदशी संबंधित असलेल्या जमात-उद-दवा (जेयूडी) आणि फला-इ-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) यांच्यावतीने संचालित एक मदरसा आणि चार दवाखान्यांचा ताबा घेतला आहे. हा मदरसा धार्मिक मालमतांचे नियंत्रण करणाऱ्या औकाफ विभागाला सोपवण्यात आला असल्याचे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले आहे.
प्रांतिक सरकारने गेल्या शुक्रवारी औकाफ विभागाला या मदरशाचा ताबा घेण्याचे निर्देश दिले. प्रांतिक सरकारने रावळपिंडीतील चार मदरशांची यादी जिल्हा प्रशासनाला सोपवल्यानंतर प्रशासनाने या मदरशांना भेट दिली, मात्र जेयूडीने या मदरशांशी काही संबंध असल्याचे नाकारले आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
जेयूडी व एफआयएफतर्फे संचालित एक मदरसा आणि चार दवाखान्यांचा सरकारने ताबा घेतला असल्याच्या वृत्ताला एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला. तथापि, देशभरात पसरलेल्या जेयूडीच्या कार्यालयांचा ताबा घेणे हे सरकारसाठी फार कठीण काम असल्याचे निरीक्षकांचे म्हणणए आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेल्या अनेक संस्थांविरुद्ध पाकिस्तानने अलीकडेच कारवाई केली आहे. १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान पॅरिसमध्ये होणाऱ्या फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) महत्त्वाच्या बैठकीपूर्वी हे कारवाईचे सत्र झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादाला अर्थपुरवठय़ावर लक्ष ठेवणाऱ्या या संस्थेच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये पाकिस्तानचा समावेश केला जावा यासाठी अमेरिका व भारत प्रयत्न करत आहेत. यापूर्वी फेब्रुवारी २०१२ मध्ये पाकिस्तानचा एफएटीएफच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आला होता आणि तो तीन वर्षे कायम होता.