बॉलीवूड अभिनेत्री नर्गीस फाखरी हिचे छायाचित्र असलेली पाकिस्तानी वृत्तपत्रातील जाहिरातीवर सध्या सोशल मीडियावरून टीकेचा भडीमार होताना दिसत आहे. पाकिस्तानमधील ‘जंग’ या उर्दू वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर छापून आलेल्या या जाहिरातीमध्ये नर्गीस फाखरी झोपलेल्या अवस्थेत असून तिच्या हातात एक मोबाईल फोन दाखविण्यात आला आहे. मात्र, अंगप्रदर्शन आणि अश्लीलतेच्या मुद्द्यावरून ही जाहिरात सध्या वादाचा मुद्दा बनली आहे. पाकिस्तानी पत्रकारांसह अनेकजणांनी ट्विटरच्या माध्यमातून या जाहिरातीवर सडकून टीका केली असून, ही जाहिरात खालच्या दर्जाची आणि बिनडोकपणा असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमधील शोध पत्रकार अन्सर अब्बासी यांनी ‘जंग’ वृत्तपत्राच्या प्रशासनाचा निषेध करत मुखपृष्ठावर अशी जाहिरात छापणे म्हणजे बिनडोकपणा असल्याचे म्हटले आहे. मतिउल्ला जान यांनीदेखील अन्सर अब्बासी यांच्या म्हणण्याचे समर्थन केले असून नर्गीस फाखरी हिच्या कमनीय शरीराचा थ्री जी मोबाईल फोन आणि त्याच्या स्वस्त किंमतीशी काहीही संबंध नसल्याचे मत ट्विटरवर व्यक्त केले. एखाद्या राष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तपत्रात अशाप्रकारची जाहिरात छापून येणे अयोग्य असल्याचेही अनेकजणांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani ad featuring nargis fakhri sparks outrage online