बिहारमध्ये आघाडी करण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी विनंती लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन केली. घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत सुस्पष्टता आवश्यक असल्याने पासवान यांनी ही भेट घेतली, असे कळते.
आपला पक्ष राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी जागावाटपाची चर्चा करणार नाही, असे पासवान यांनी सोनिया गांधी यांना सांगितल्याचे सूत्रांनी स्पष्ट केल्याने या दोन्ही पक्षात बेबनाव असल्यावर शिक्कमोर्तब झाले आहे. या वेळी पासवान यांचे पुत्र चिराग पासवान हे उपस्थित होते. राजदसमवेत आघाडी केल्यास भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून काँग्रेसला ते अडचणीचे ठरू शकते, असे चिराग पासवान यांनी या वेळी सोनिया गांधी यांना सांगितल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
लोकजनशक्ती पक्षाला जागावाटपात योग्य तो वाटा मिळेल, असे आश्वासन गांधी यांनी द्यावे. लोकजनशक्ती पक्ष १० जागांपेक्षा कमी जागा स्वीकारणार नाही, असे चिराग पासवान यांनी सोनिया गांधी यांना सूचित केल्याचे सूत्रांनी सांगितले. सोनिया गांधी यांनीच आता या बाबत पुढाकार घ्यावा, असे रामविलास पासवान म्हणाले.
लोकजनशक्ती पक्ष काँग्रेससमवेत आघाडी करणार असल्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असून आता अन्य कोणत्या पक्षांना आघाडीत घ्यावयाचे त्याचा निर्णय काँग्रेसने घ्यावयाचा आहे, असे चिराग पासवान यांनी सांगितले. जागावाटपाबाबत सुस्पष्टता असावी, हाच बुधवारी गांधी यांची भेट घेण्याचा उद्देश होता, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
बिहारमध्ये आघाडीबाबत सोनिया-पासवान चर्चा
बिहारमध्ये आघाडी करण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी विनंती लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-01-2014 at 12:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paswan meets sonia over alliance formation in bihar