अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंदिरासमोर उभारण्यात येत असलेल्या व्हीआयपी गेटजवळ हा सुरक्षा रक्षक तैनात होता. मात्र, बुधवारी पहाटे सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात अचानक गोळी लागली. त्यामध्ये सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

या सुरक्षा रक्षकाला गोळी लागल्यानंतर त्या ठिकाणी तैनात असलेल्या दुसऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या सुरक्षा रक्षकाला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. ही घटना घडलेल्या ठिकाणापासून राम मंदिर फक्त १५० मीटर अंतरावर असल्याची माहिती सांगितली जात आहे.

हेही वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्री ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ लिहिताना अडखळल्या, फळ्यावर काय लिहिलं एकदा वाचाच!

शत्रुघ्न विश्वकर्मा असं गोळी लागून मृत्यू झालेल्या या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेश येथील आंबेडकर नगरमधील रहिवासी होता. या सुरक्षा रक्षकाला ही गोळी कशी लागली? नेमकं काय घडलं? यासंदर्भातील तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी एसएसएफचे जवान तैनात करण्यात येतात. त्यामध्ये हा सुरक्षा रक्षक सामील होता.

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले असून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी जाऊन तपास करत आहे. याच बरोबर या सुरक्षा रक्षकाच्या बरोबर ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शत्रुघ्न विश्वकर्मा यांना स्वत:कडूनच चूकून गोळी लागल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, पोलीस या संपूर्ण घटनेता तपास करणार आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलिस महानिरीक्षक काय म्हणाले?

या घटनेबाबत पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितलं की, “कोटेश्वर मंदिरासमोरील व्हीआयपी गेटजवळ विशेष सुरक्षा दलाचे (एसएसएफ) जवान शत्रुघ्न विश्वकर्मा हे तैनात होते. आता या घटनेचा तपास करण्यात येणार असून या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू कशामुळे झाला? याची माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.”