चीनमध्ये आणखी एका रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. न्युमोनियासदृश हा आजार असून यामुळे लहान मुलांना श्वासोच्छवास घेण्यास अडचणी येत आहेत. चीनमध्ये वेगाने हा आजार लहान मुलांमध्ये पसरत असल्याने भारतानेही पूर्वतयारी सुरू केली आहे. तसंच, केंद्राने सर्व राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले असून अशा आजारांना तोंड देण्यासाठी राज्यपातळीवर उपाययोजना आखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रविवारी केंद्र सरकारने राज्यांना श्वसनाच्या आजाराविरुद्धच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगितले होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सध्या कोणताही धोका नाही. परंतु, या रोगावर देखरेख आणि नियंत्रण मिळवण्याकरता उपाययोजना आखण्याचे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले.
उत्तर चीनमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. निदान झालेल्या लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे क्लस्टर्स नोंदवले गेले आहेत. हे क्लस्टर्स मायकोप्लाझ्मा न्यूमोनियासारख्या विविध रोगजनकांच्या रक्ताभिसरणाचे असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु, हा विषाणू कोविड १९ सारखा संसर्गजन्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
उत्तराखंड
चमोली, उत्तरकाशी आणि पिथौरागढ हे तीन जिल्हे चीनच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयसोलेशन बेड/वॉर्ड, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सिलिंडरची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली. गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) च्या लक्षणांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जर सामुदायिक स्तरावर SARI प्रकरणांचे क्लस्टरिंग आढळले तर त्यासाठी व्यवस्था करून रोगावर उपचार आणि नियंत्रण मिळवावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
राजस्थान
राजस्थानच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव शुभ्रा सिंह यांनी अधिकाऱ्यांना रोगाच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठी तीन दिवसांत कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. परिस्थिती सध्या चिंताजनक नाही असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की वैद्यकीय कर्मचार्यांनी राज्यभरातील संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्ण दक्षतेने काम केले पाहिजे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. अधिकाऱ्यांना जिल्हा आणि वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसंच, विभाग आणि जिल्हा स्तरावर जलद प्रतिसाद पथके तयार करण्यास सांगितले आहे.
गुजरात
गुजरातच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी त्यांच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. गुजरातचे आरोग्य मंत्री रुषिकेश पटेल म्हणाले की, राज्य आणि केंद्राने कोविड-१९ साथीच्या काळात तयार केलेल्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना खबरदारीचा उपाय म्हणून बळकट केले जात आहे.
कर्नाटक
कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. “मी जनतेला सूचनांचे पालन करण्याची विनंती करतो, काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या आणि इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी उपाययोजना करा. लक्षणे आढळल्यास वेळेवर उपचारांसाठी तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात भेट द्या. मी लोकांना विनंती करतो की घाबरू नका परंतु आवश्यक खबरदारी घ्या”, असं त्ंयानी X वर लिहिले.
हरियाणा
हरियाणा सरकारने देखील इन्फ्लूएंझासदृश आजार (ILIs) आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARIs) वर नियंत्रण ठेवणे आणि असामान्य श्वसन आजाराच्या कोणत्याही क्लस्टरिंगचा अहवाल देण्यासाठी राज्यभरातील सर्व सिव्हिल सर्जनना निर्देश जारी केले आहेत.