सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन यांना अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने शुक्रवारी (२६ मे) वैद्यकीय आधारावर सत्येंद्र जैन यांना ६ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. ते मे २०२२ पासून मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्येंद्र जैन यांना त्यांच्या आजारपणावर खासगी रुग्णालयात उपचार घेता यावेत यासाठी ६ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने ठरवलेल्या अटीही लागू केल्या आहेत. याशिवाय जामीन मिळाल्यानंतर सत्येंद्र जैन यांनी माध्यमांकडे जाऊन या प्रकरणाविषयी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये आणि साक्षीदारांना प्रभावित करू नये, असेही निर्देश दिले.

ईडीकडून सत्येंद्र जैन यांच्या जामिनावर आक्षेप

ईडीने सत्येंद्र जैन यांच्या जामिनाच्या मागणीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत सत्येंद्र जैन यांच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालावर शंका उपस्थित केली. तसेच दिल्लीच्या एम्समधील रुग्णालयाच्या विशेष पथकाकडून जैन यांची स्वतंत्रपणे वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी केली. मात्र, खंडपीठाने ही मागणी अमान्य केली.

हेही वाचा : विश्लेषण : पाकिस्तानची न्यायव्यवस्था कसे काम करते? 

आता या प्रकरणी पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय सत्येंद्र जैन यांच्या नव्या वैद्यकीय अहवालाची पाहणी करेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court grants interim bail to aap leader satyender jain in money laundering case pbs