अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या तालिबानच्या हंगामी सरकारने स्थानप केलेल्या विशेष लष्करी पथकाला ‘पानिपत’ असं नाव दिलं आहे. अहमद शाह दुर्राणीच्या नेतृत्वाखाली १७६१ साली झालेल्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव केलेल्या अफगाणी फौजांकडून प्रेरणा घेण्याच्या हेतूने हे नाव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या माध्यमातून तालिबानने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावरुनही तालिबानने केलेल्या या नामकरणावरुन चांगलीच टीकेची झोड उठवण्यात आलीय. मागील वर्षी अमेरिकेने अफागाणिस्तानमधील लष्कर मागे घेतल्यानंतर तालिबानने या देशावर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी अशाप्रकारे भारताशी संबंधित निर्णय घेत थेट भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. फाजिल देशाभिमान दाखवण्याच्या नादात तालिबान भारताचा तिरस्कार करतोय अशी टीका अनेकांनी केलीय.

देशाच्या पूर्वेला पाकिस्तानला लागून असणाऱ्या नांगरहार प्रांतामध्ये ‘पानिपत ऑप्रेशनल युनिट’ तैनात करणार येणार असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. तालिबानने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरुन लष्करी गणवेशातील मास्क घातलेल्या व्यक्तींचे फोटो शेअर केल्याचं अफगाणिस्तानमधील अजमल न्यूजने म्हटलं होतं. नांगरहार प्रांताची राजधानी असणाऱ्या जलालाबादमध्ये हे सैनिक लष्करी सराव करत असताना हे फोटो काढण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

पानिपतच्या लढाईचा संदर्भ अनेकदा अफगाणिस्तानमधील ग्रामीण भागांमध्ये दिला जातो. येथील मुस्लिमांच्या भावना भडकवण्यासाठी आणि त्यांना शस्त्र हाती घेण्यासाठी प्रेरित करायला पानिपतच्या युद्धामधील गोष्टी सांगितल्या जातात. या ठिकाणी काश्मीर, पॅलेस्टाइनसारख्या गोष्टींवर मशिदी आणि प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी पाकिस्तानबरोबरच अफगाणिस्तानमध्येही चर्चेत असतात.

सोशल मीडियावरुन या नामकरणाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत असला तरी काहींनी यावरुन तालिबान्यांचं कौतुकही केलंय. अफगाणिस्तानमधील जावीद तन्वीर या युझरने भूतकाळात जे घडलंय तेच पुन्हा घडेल असं म्हटलंय. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील अन्य एकाने हे फारच मजेशीर आणि माज दाखवणारं आहे. हा आदेश पाकिस्तानकडून आल्यासारखं वाटतंय. पाकिस्तानला भारताविरुद्ध खुसपटं काढायची असल्याने त्यांच्या सांगण्यावरुन हे करण्यात आल्याची टीका काहींनी केलीय.

तालिबान्यांच्या या निर्णयावरुन अनेक भारतीयांनी तालिबान्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. आधी अफगाणिस्तानी नागरिकांना चांगलं जीवनमान देण्यासाठी प्रयत्न करा, असा फाजील देशाभिमान दाखवणं हे तालिबान्यांसाठी काही नवीन नाही, असल्या गोष्टींना भारतीय परराष्ट्र मंत्रालय भीक घालणार नाही, तुमच्या या हस्यास्पद गोष्टींना भारताकडून साधा प्रतिसादही मिळणार नाही, अशापद्धतीच्या अनेक प्रतिक्रिया भारतीयांनी दिल्यात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban jingoism to spite india new afghan rulers raise panipat military unit scsg