गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धक्कादायक प्रसंग घडला आहे. ३९ वर्षीय सहशिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शाळेच्या आवारात बलात्कार केल्याचा आरोप केला जात आहे. पीडित विद्यार्थीनीच्या आईने शिक्षकाविरोधात माधवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला बुधवारी अटक करण्यात आली. २२ आणि २३ जानेवारी रोजी शाळेचा वर्ग आणि प्रयोगशाळेत शिक्षकाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप आईने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या शिक्षकावर आरोप झाले आहेत, तो १७ डिसेबंर रोजी या शाळेत रुजू झाला होता. २२ आणि २३ जानेवारी रोजी मधल्या सुट्टीत वर्ग मोकळा झाला असताना त्याने अत्याचार केला, असे चौकशीतून पुढे आले आहे. सोमवारी (दि. २७ जानेवारी) पीडित विद्यार्थीनीने एका महिला शिक्षिकेला आणि तिच्या कुटुंबियांना तिच्यावर घडलेला प्रसंग कथन केला. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पोरबंदर (ग्रामीण) सह पोलीस अक्षीक्षक सुरजीत महेदू यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी शिक्षक विद्यार्थीनीला शाळेच्या विविध भागात नेताना दिसत आहे. विद्यार्थीनीला शिक्षक नेत असताना ज्या ज्या प्रत्यक्षदर्शींनी पाहिले, त्यांचाही जबाब नोंदविण्यात येत आहे. विद्यार्थीनीचे वैद्यकीय चाचणी झाली असून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरजीत महेदू यांनी पुढे सांगितले की, आरोपीने इतर विद्यार्थींनीशीही असा प्रकार केला आहे का? याचाही तपास केला जात आहे. शाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्राचा विषय शिकवत होता.

नेमका गुन्हा कसा घडला?

२२ जानेवारी रोजी आरोपी शिक्षकाने पीडित विद्यार्थीनीला शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर नेले, तिथे तिच्या मासिक पाळीची चौकशी केल्यानंतर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. दुसऱ्या दिवशीही पीडितेला दुसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आला. जर तिने कुणाला याबाबत काही सांगितले तर खिडकीतून खाली फेकून देऊ, अशी धमकीही दिली. धमकीमुळे सुरुवातीला मुलगी घाबरली होती. मात्र नंतर तिने धाडस दाखवत वर्गशिक्षिकेला याची माहिती दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher held for raping class 6 girl in school during recess threatned to throw her off building