अवघ्या दोन रुपयांसाठी एका ग्राहकानं पानटपरीवाल्याला भोसकल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा लुधियानातील सराभा नगर परिसरात घडली आहे. यात तो गंभीर जखमी झाला. रोहित कुमार असं त्याचं नाव आहे. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी सराभा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पानटपरीचा मूळ मालक असलेल्या सुनील कुमार यांनी सांगितलं की, “सोमवारी संध्याकाळी माझा मेहुणा रोहित हा मदत करण्यासाठी टपरीवर आला होता. त्याचवेळी टपरीवर एक ग्राहक आला. त्यानं १० रुपये देऊन सिगारेट खरेदी केला. त्यावर दोन रुपये आणखी दे, असं रोहितनं त्याला सांगितलं. मात्र, त्यानं ते देण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्या व्यक्तीनं रोहितवर चाकूनं हल्ला केला आणि तेथून पसार झाला.” चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहितला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी सराभा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अनोळखी हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. टपरीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unidentified man allegedly stabbed cigarette vendor sarabha nagar ludhiana over two rupees